Cryptocurrency Market : एकीकडे शेअर बाजार सावरत असताना गुंतवणूकदारांना दुसरीकडे मोठा धक्का बसला आहे. क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये पुन्हा एकदा मोठी आणि तीव्र घसरण पाहायला मिळत आहे. बाजारातील अस्थिरता आणि 'लिक्विडिटी'च्या चिंतेमुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. घसरणीचा भारतीय गुंतवणूकदारांना थेट मोठा फटका बसला आहे. बिटकॉइन ऑक्टोबरमधील उच्चांकावरून जवळपास २५% खाली आला आहे. तर इथर ऑगस्टच्या सर्वोच्च स्तरावरून ३५% कोसळला आहे. बाजारात आलेल्या या जोरदार घसरणीमुळे अनेकांच्या मनात आता बिअर मार्केट अधिक तीव्र होईल का, अशी भीती निर्माण झाली आहे.
भारतीय गुंतवणूकदारांना मोठा झटका
या घसरणीमुळे भारतीय गुंतवणूकदारांच्या संपत्तीचे मोठे मूल्य कमी झाले आहे. बिटकॉइनचा भाव ऑक्टोबरमध्ये सरासरी ६० लाख रुपये होता आणि आता २५% घसरल्यामुळे एका बिटकॉइनवर थेट १५,००,००० (१५ लाख रुपये) चे नुकसान झाले आहे. याचा अर्थ, ऑक्टोबरच्या उच्चांकावर खरेदी केलेल्या एका बिटकॉइनची होल्डिंग आता जवळपास ४५ लाखांवर आली आहे.
दुसरीकडे, इथरची घसरण बिटकॉइनपेक्षा जास्त तीव्र आहे. इथरचा ऑगस्ट महिन्यातील सरासरी भाव सुमारे ३.९० लाख रुपये होता. आता ३५% क्रॅश झाल्यामुळे एका इथरचे मूल्य २.५४ लाख रुपये झाले आहे, म्हणजेच सुमारे १,३६,५०० रुपयांचे नुकसान झाले आहे. ही तीव्र घसरण DeFi, NFT आणि Web3 इकोसिस्टममध्ये वापरात घट झाल्याचे संकेत देत आहे.
क्रिप्टोमध्ये भीती वाढण्याची प्रमुख कारणे
बाजार विश्लेषकांच्या मते, क्रिप्टो मार्केटमधील सध्याच्या दबावामागे लिक्विडिटीची कमतरता हे सर्वात मोठे कारण आहे. बाजारात खरेदीदार कमी आहेत, तर विकणारे जास्त आहेत. मोठे फंड्स आणि संस्थात्मक गुंतवणूकदार सध्या खरेदी करत नाहीत आणि ट्रेडिंग व्हॉल्यूमही कमी झाला आहे. स्टेबलकॉइन्स (उदा. USDT, USDC) चा पुरवठा घटणे आणि एक्स्चेंजेसवरून गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात फंड बाहेर काढत असल्याने, बाजारातील लिक्विडिटी कमी झाली आहे. जेव्हा लिक्विडिटी कमी होते, तेव्हा किमती वेगाने खाली येतात.
पुढे काय?
गुंतवणूकदारांमध्ये सध्या पॅनिक मोड आहे. अनेक जण आपला नफा वाचवण्यासाठी वेगाने विक्री करत आहेत. घसरणीत खरेदी करण्याऐवजी पैसे वाचवा असा पवित्रा घेतला जात आहे. सीएनबीसीच्या अहवालानुसार, बिटकॉइन २५% घसरल्यानंतर एका महत्त्वाच्या तांत्रिक सपोर्ट स्तरावर पोहोचला आहे, तर ईथरची ३५% घसरण त्याची स्ट्रक्चरल कमजोरी दाखवते. विश्लेषकांचे मत आहे की, बाजाराला स्थिर होण्यासाठी वेळ लागेल, त्यामुळे पुढील काही दिवस क्रिप्टो बाजार अस्थिर आणि अनिश्चित राहण्याची शक्यता आहे.
