ह्षवर्धन पाटील : मराठवाडा व विदर्भातील दुष्काळामुळे साखर उत्पादन घटणारकोल्हापूर : राज्यातील ऊस गळीत हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याची माहिती सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शनिवारी दिली. यंदा नव्याने एक हजार मेगावॅट सहवीज प्रकल्पाला मान्यता देण्यात आल्याचे ते म्हणाल़े नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत साखर कारखाने 15 ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तशा प्रकारचे आदेश साखरआयुक्त कार्यालयास देण्यात आले आहेत. पुढील हंगामात 80 ते 82 लाख मेट्रिक टन साखर उत्पादन होईल, असा प्राथमिक अंदाज आहे. मराठवाडा, विदर्भात काही भागांत पाऊस झालेला नसून, तिथे दुष्काळाची परिस्थिती आहे. त्यामुळे साखर उत्पादन घटण्याचीही शक्यता पाटील यांनी व्यक्त केली.गतवर्षीचा उसाचा अंतिम भाव तसेच पुढील वर्षाच्या हंगामातील पहिली उचल किती असावी, याबाबतचा निर्णय साखर दरनियंत्रण समिती घेईल. राज्य सरकारने एफ. आर. पी. निश्चित केली आहे. साडेनऊ टक्के उतार्यास 2200 रुपये, तर पुढील प्रत्येकी एक टक्का दराला 235 रुपये देण्यात येतील. जे कारखाने एफ. आर. पी. देणार नाहीत, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. महत्त्वाचे म्हणजे एफ. आर. पी. ही सहकारी तसेच खासगी साखर कारखान्यांनाही लागू राहील. त्यामध्ये तडजोड केली जाणार नाही, असे पाटील यांनी स्पष्ट केले. राज्य सरकारने यापूर्वी 2100 मेगावॅटच्या सहवीज प्रकल्पांना परवानगी दिली होती. त्यांपैकी 1500 मेगावॅटचे प्रकल्प पूर्ण झाले आहेत. आता नव्याने एक हजार मेगावॅट सहवीज प्रकल्पांना मान्यता दिली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. जिल्हा मध्यवर्ती बॅँकांमार्फत दिल्या जाणार्या पीक कर्जाच्या व्याजाला सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यासाठी 231 कोटी रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात आले. त्यातील 131 कोटी रुपये हे व्याजातील सवलतीसाठी देण्यात येतील. उर्वरित रक्कम ही विकास सेवा सोसायट्या आणि गटसचिवांना उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
गळीत हंगाम 15 ऑक्टोबरपासून
हर्षवर्धन पाटील : मराठवाडा व विदर्भातील दुष्काळामुळे साखर उत्पादन घटणार
By admin | Updated: August 16, 2014 23:07 IST2014-08-16T23:07:57+5:302014-08-16T23:07:57+5:30
हर्षवर्धन पाटील : मराठवाडा व विदर्भातील दुष्काळामुळे साखर उत्पादन घटणार
