Henan Kuangshan Crane : साधारणपणे कंपन्या वर्षाच्या शेवटी आपल्या नफ्यातील छोटासा हिस्सा बोनस म्हणून कर्मचाऱ्यांना देतात. मात्र, चीनमधील एका कंपनीच्या मालकाची उदारता पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. या कंपनीने आपल्या निव्वळ नफ्याचा तब्बल ७० टक्के हिस्सा बोनस म्हणून थेट कर्मचाऱ्यांच्या हातात सुपूर्द केला आहे.
पार्टीत पैशांचा डोंगर; मोजता मोजता कर्मचारी थकले!
चीनमधील 'हेनान कुआंगशान क्रेन कंपनी लिमिटेड' या कंपनीने १३ फेब्रुवारी रोजी आपल्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन केले होते. या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे स्टेजवर कोणत्याही भेटवस्तूऐवजी नोटांच्या थप्प्या लावल्या होत्या. या कार्यक्रमात ७,००० कर्मचारी सहभागी झाले होते. ८०० बँक्वेट टेबल्सवर नोटांचे ढीग ठेवण्यात आले होते. स्टेजवरच कर्मचाऱ्यांना बोलावून सुमारे ८० कोटी रुपये (६ कोटी युआन) रोख वाटण्यात आले. ऑनलाइन वाटप धरून कंपनीने एकूण २४० कोटी रुपये (१८ कोटी युआन) बोनस दिला. हा आकडा कंपनीच्या २०२५ मधील एकूण निव्वळ नफ्याच्या ७०% इतका आहे.
वॉशिंग मशीन नको, रोख रक्कम द्या!
या कंपनीचे सर्वेसर्वा आणि चेअरमन कुई पेइजुन यांची एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्यांनी ऐनवेळी कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या वॉशिंग मशीनसारख्या भेटवस्तू रद्द केल्या. आम्ही वॉशिंग मशीन का देतोय? लोकांना सोन्याचे दर वाढल्यासारखे वाटतेय का? गेल्या वर्षी आपण दागिने दिले होते, आता थेट रोख रक्कम आणा आणि प्रत्येकाला अतिरिक्त २०,००० युआन द्या! असे पेइजुन म्हणाले.
वाचा - आठवड्यात शेअर बाजार तब्बल ५% घसरला! गुंतवणूकदारांसाठी संधी की अजून वाट पाहावी?
कंपनीचे यश आणि मालकी
कुई पेइजुन यांच्याकडे कंपनीची ९८.८८% मालकी आहे. त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या कष्टाचे फळ अशा अनोख्या पद्धतीने दिल्याने, या कंपनीत कामाला लागण्यासाठी आता अनेकांची धडपड सुरू झाली आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये अनेक कर्मचारी नोटांचे मोठे बंडल उचलताना दमल्याचे आणि काहींनी तर अक्षरशः गोण्या भरून पैसे नेल्याचे दिसत आहे.
