Central Govt Bonus 2025 : देशभरात सणासुदीचा उत्साह सुरू असतानाच, केंद्र सरकारने आपल्या लाखो कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे. अर्थ मंत्रालयाने सोमवारी जारी केलेल्या आदेशानुसार, केंद्र सरकार आपल्या गट क आणि अराजपत्रित गट ब कर्मचाऱ्यांना ३० दिवसांच्या वेतनाच्या बरोबरीचा नॉन-प्रॉडक्टिव्हिटी लिंक्ड बोनस देणार आहे. या निर्णयामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. केंद्र सरकारने आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी पात्र कर्मचाऱ्यांसाठी ६,९०८ रुपये इतका बोनस निश्चित केला आहे.
कोणाला मिळणार हा बोनस?
अर्थ मंत्रालयाच्या आदेशानुसार, खालील कर्मचाऱ्यांना या बोनसचा लाभ मिळणार आहे.
- पात्रता: ज्या कर्मचाऱ्यांनी ३१ मार्च २०२५ पर्यंत सलग किमान सहा महिने सेवा पूर्ण केली आहे आणि जे या तारखेपर्यंत सेवेत आहेत, त्यांना हा बोनस मिळेल.
- इतर लाभार्थी: केंद्रीय निमलष्करी दल आणि सशस्त्र दलातील सर्व कर्मचाऱ्यांना हा बोनस लागू असेल. तसेच, केंद्रशासित प्रदेशातील जे कर्मचारी केंद्र सरकारच्या वेतन रचनेनुसार वेतन घेतात, त्यांनाही बोनसची रक्कम दिली जाईल.
- प्रो-राटा तत्त्व: ज्या कर्मचाऱ्यांनी संपूर्ण वर्षभर (१२ महिने) सेवा दिली नाही, त्यांना केलेल्या कामाच्या महिन्यांच्या आधारावर 'प्रो-राटा' तत्वावर बोनस मिळेल.
कमाल मर्यादा आणि बोनसची गणना
- या ॲड-हॉक बोनसच्या गणनेसाठी केंद्र सरकारने मासिक वेतनाची कमाल मर्यादा ७,००० रुपये निश्चित केली आहे.
- गणना पद्धत: कर्मचाऱ्यांचे सरासरी वेतन किंवा गणनेची कमाल मर्यादा (म्हणजे ₹७,०००), यापैकी जी रक्कम कमी असेल, त्यावर बोनसची गणना केली जाईल.
- बोनस रक्कम: या गणनेनुसार, ज्या कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन ७,००० रुपये आहे, त्यांना ३० दिवसांच्या हिशोबाने सुमारे ६,९०७ रुपये (७०००\३०/३०.४) इतका बोनस मिळेल.
कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठीही दिलासा
सरकारने ॲड-हॉक आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही बोनस देण्याची घोषणा केली आहे. मागील तीन वर्षांपासून सातत्याने सेवा देणाऱ्या कॅज्युअल कर्मचाऱ्यांना बोनस म्हणून १,१८४ रुपये मिळतील.
सरकारी कर्मचाऱ्यांच्या हातात ऐन सणासुदीच्या काळात हा अतिरिक्त निधी मिळाल्याने त्यांच्या खरेदीलाही चालना मिळेल, अशी अपेक्षा आहे.