India Pak Tension Banking System: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बँकांना सतर्क राहण्याचे आणि ग्राहकांना अखंडित सेवा देण्यासाठी सर्व पावलं उचलण्याचे निर्देश दिले आहेत. सायबर सुरक्षेच्या तयारीबाबत बँका आणि विमा कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत अर्थमंत्र्यांनी आव्हानात्मक काळात आर्थिक स्थैर्य सुनिश्चित करण्यासाठी बँकिंग आणि वित्तीय क्षेत्राच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर भर दिला. या बैठकीत बँका आणि विमा कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांव्यतिरिक्त वित्तीय सेवा विभाग (अर्थ मंत्रालय), आरबीआय, आयआरडीएआय आणि एनपीसीआयचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.
बँकिंग सेवा विनाव्यत्यय आणि कोणत्याही गडबडीशिवाय सुरू राहायला हवी. यामध्ये बँक शाखा आणि डिजिटल बँकांचा समावेश आहे. कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीचा सामना करण्यासाठी बँकांनी आपत्कालीन प्रोटोकॉल अपडेट करण्यासोबत त्याची चाचणी केली पाहिजे, असं सीतारामन म्हणाल्या. सीमावर्ती भागातील शाखांमध्ये काम करणारे बँक कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षिततेची खात्री करण्याचे निर्देशही अर्थमंत्र्यांनी बँकांना दिलेत.
जीडीपी, जॉब आणि डेव्हलपमेंटमध्ये पाकिस्तानची दूरपर्यंत भारताशी तुलना नाही; पाहा 'ही' आकडेवारी
पुरेशी कॅश व्यवस्था
सर्वसामान्यांना आणि व्यवसायांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये, असं त्यांनी बँकांना सांगितलं. एटीएममध्ये पुरेशी रोकड, विनाअडथळा यूपीआय आणि इंटरनेट बँकिंग आणि आवश्यक बँकिंग सुविधांची उपलब्धता ही सर्वांची प्राथमिकता असली पाहिजे. या बैठकीत अर्थमंत्र्यांनी कामकाज आणि सायबर सुरक्षेच्या तयारीचा आढावा घेतला. सुरक्षा यंत्रणांशी प्रभावीपणे समन्वय साधून बँकांमध्ये पुरेशी सुरक्षा सुनिश्चित करण्याचे निर्देशही सीतारामन यांनी बँकांना दिले आहेत.