Lokmat Money > बिझनेस न्यूज > दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!

दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!

Real Estate : दुसरी मालमत्ता खरेदी करण्यापूर्वी, ती खरेदी करण्याचा उद्देश, बजेट आणि स्थान काळजीपूर्वक समजून घ्या.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2025 17:25 IST2025-08-24T17:23:10+5:302025-08-24T17:25:19+5:30

Real Estate : दुसरी मालमत्ता खरेदी करण्यापूर्वी, ती खरेदी करण्याचा उद्देश, बजेट आणि स्थान काळजीपूर्वक समजून घ्या.

Buying a Second Home? What to Know Before You Invest | दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!

दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!

Real Estate : सध्याच्या काळात प्रत्येकाला एक स्वतःचे घर असावे असे वाटते. जर पहिले घर घेतले असेल, तर दुसरे घर घेण्याचा विचारही मनात येतो. यामागे प्रत्येकाची वेगवेगळी कारणे असू शकतात. काही लोकांना विकेंडसाठी शांत जागा हवी असते, काही भाड्यापासून कमाईचे स्वप्न पाहतात, तर काही निवृत्तीनंतरसाठी एक शांत ठिकाण शोधत असतात. पण, दुसरे घर खरेदी करण्याचा निर्णय विचारपूर्वक, योग्य नियोजन आणि योग्य माहिती घेऊनच घ्यायला हवा, जेणेकरून नंतर पश्चात्ताप करण्याची वेळ येणार नाही. दुसरे घर घेण्यापूर्वी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, हे जाणून घेऊया.

दुसरे घर कशासाठी हवे आहे?
सर्वात आधी, ही प्रॉपर्टी घेण्याचा तुमचा उद्देश काय आहे, हे ठरवा. तुम्हाला स्वतःसाठी तेथे राहायचे आहे, ते भाड्याने द्यायचे आहे, की निवृत्तीनंतरसाठी ठेवायचे आहे?
जर विकेंड गेटअवेसाठी हवे असेल, तर शांत जागा निवडा.
जर भाड्यापासून कमाई हवी असेल, तर शहराच्या चांगल्या लोकेशनवर लक्ष केंद्रित करा.
जर निवृत्तीसाठी हवे असेल, तर सोयीस्कर आणि सुरक्षित जागा निवडा.
उद्देश स्पष्ट असेल, तर लोकेशन, बजेट आणि प्रॉपर्टीचा प्रकार निवडणे सोपे होईल.

बजेटमध्ये बसते का?
दुसरे घर घेण्यापूर्वी तुमच्या आर्थिक स्थितीची तपासणी करणे महत्त्वाचे आहे. पहिली ईएमआय (EMI) सुरू असल्यास, नव्या कर्जाची क्षमता तपासा. 'डाऊन पेमेंट', स्टँप ड्युटी, रजिस्ट्रेशन आणि देखभाल खर्च यांसारख्या खर्चांकडे दुर्लक्ष करू नका. जर थेट प्रॉपर्टी घेणे परवडत नसेल, तर REIT (रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट) किंवा रिअल इस्टेट फंड्ससारखे पर्यायही पाहू शकता.

प्रॉपर्टीचा प्रकार आणि त्याचे फायदे-तोटे
हॉलिडे होम : हा एक प्रकारचा 'लाइफस्टाइल इन्व्हेस्टमेंट' आहे. कुटुंबासोबत विकेंड घालवण्यासाठी उत्तम, पण यातून मिळणारे भाडे उत्पन्न अनियमित असू शकते. शहरापासून लांब असल्यामुळे भाडेकरू मिळवणे कठीण होऊ शकते. त्यामुळे, याला आर्थिक नव्हे, तर 'भावनिक गुंतवणूक' समजा.

शहरात फ्लॅट: जर तुम्हाला नियमित उत्पन्न हवे असेल, तर शहरात फ्लॅट घेणे हा चांगला पर्याय आहे. योग्य लोकेशनवर फ्लॅट असेल, तर चांगले भाडे मिळू शकते आणि कालांतराने प्रॉपर्टीची किंमतही वाढते. पण, चुकीची जागा निवडल्यास तुमचे पैसे अडकू शकतात.

निवृत्तीसाठी घर: भविष्यात शांत आणि कमी देखभाल खर्च असलेले घर हवे असल्यास, निवृत्तीच्या घराचा विचार करू शकता. पण, जर हे घर खूप लवकर खरेदी केले, तर भविष्यात तुमच्या गरजांनुसार ते योग्य ठरेलच असे नाही.

वाचा - निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?

शेवटचा सल्ला : दुसरे घर घेणे हा एक मोठा आर्थिक निर्णय आहे. तुमचा उद्देश स्पष्ट असेल, बजेट योग्य असेल आणि लोकेशन चांगली असेल, तर ही गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. पण, जर फक्त दिखावा किंवा भावनेच्या भरात निर्णय घेतला, तर नंतर डोकेदुखी वाढू शकते.

Web Title: Buying a Second Home? What to Know Before You Invest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.