- चंद्रकांत दडस
(वरिष्ठ उपसंपादक)
स्वतःचे घर असणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. घर खरेदी हा एक भावनिक आणि आर्थिक निर्णय असतो. अनेक लोक आपले घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गृहकर्ज घेतात. परंतु, घर खरेदी करताना ४-३-२-१ चा फॉर्म्युला लक्षात ठेवा.
येथे तुम्हीही फसता का?
बरेच लोक कोणतेही नियोजन न करता कर्ज घेतात. त्यामुळे काही महिन्यांनंतर त्यांना ईएमआयचा भार जाणवू लागतो. रोजचा खर्च भागवणेही कठीण होते. ही समस्या टाळण्यासाठी एक अतिशय सोपा मार्ग म्हणजे ४-३-२-१ बजेट सूत्र.
४-३-२-१ सूत्र काय आहे?
- ४ = ईएमआय उत्पन्नाच्या ४०%
मासिक उत्पन्नाच्या ४०% पेक्षा जास्त रक्कम ईएमआयवर खर्च करू नये.
३ = ३०% आवश्यक खर्चावर
या भागात वीज आणि पाण्याचे बिल, किराणा सामान, मुलांचे शाळेचे शुल्क, इंधन, विमा प्रीमियम आणि इतर मासिक गरजा समाविष्ट असाव्यात.
२ = २०% बचत, आपत्कालीन स्थिती
हा भाग गुंतवणूक, मुदत ठेव, म्युच्युअल फंड, पीएफ किंवा आपत्कालीन निधी तयार करण्यासाठी ठेवला पाहिजे.
१ = १०% मनोरंजन आणि कुटुंब
हे सूत्र का आवश्यक आहे?
आर्थिक स्थिरता : ईएमआय एका निश्चित मर्यादेत ठेवल्याने खर्च व बचत यांच्यातील संतुलन सुनिश्चित होते.
सुरक्षिततेची भावना : बचत आणि आपत्कालीन निधी तुम्हाला अनपेक्षित परिस्थितीत सुरक्षित ठेवतात.
कारण : जीवन म्हणजे फक्त ईएमआय व बिले भरणे नाही. तुमच्या कुटुंबाचे कल्याणदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. घर घेताना हे नेहमी ध्यानात ठेवा.