Rakesh Jhunjhuwala Journey: 'बिग बुल ऑफ दलाल स्ट्रीट' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राकेश झुनझुनवाला यांनी फक्त ५ हजार रुपयांपासून सुरुवात केली आणि ४० हजार कोटींहून अधिक संपत्ती उभारली. त्यांचं जीवन भारतीय शेअर बाजारातील सर्वात प्रेरणादायी कथांपैकी एक मानलं जातं. ५ जुलै १९६० रोजी मुंबईतील एका साध्या मारवाडी कुटुंबात जन्मलेले झुनझुनवाला यांचे वडील आयकर विभागात अधिकारी होते. त्यांचे वडील अनेकदा त्यांच्या मित्रांसोबत शेअर बाजाराबद्दल बोलत असत, येथूनच राकेश झुनझुनवाला यांनाही त्याची आवड निर्माण झाली. त्यांच्या वडिलांनी त्यांना व्यवसाय आणि बाजाराबद्दलची समज वाढावी म्हणून दररोज वर्तमानपत्र वाचण्याचा सल्ला दिला.
सुरक्षित नोकरीचा मार्ग सोडला
सिडेनहॅम कॉलेजमध्ये शिक्षण आणि नंतर चार्टर्ड अकाउंटंट झाल्यानंतर, त्यांनी सुरक्षित नोकरीचा मार्ग सोडला आणि शेअर बाजार निवडला. सुरुवातीच्या गुंतवणुकीसाठी त्यांनी त्यांच्या भावाकडून ५ हजार रुपये कर्ज घेतलं. १९८६ मध्ये, त्यांनी जोखीम घेतली आणि जास्त व्याजदरानं अधिक पैसे उभे केले. त्यांचा पहिली मोठी पैज टाटा टी वर होती. ४३ रुपयांना खरेदी केलेले शेअर्स तीन महिन्यांत १४३ रुपयांवर पोहोचले आणि त्यांनी सुमारे ५ लाख रुपये कमावले. नंतर, टाटा पॉवर आणि सेसा गोवामध्ये वेळेवर गुंतवणूक केल्यानं त्याचं भांडवल वाढलं. परंतु सर्वात ऐतिहासिक गुंतवणूक टायटन कंपनीमध्ये होती. २००० च्या दशकाच्या सुरुवातीला, जेव्हा कंपनी अडचणीत होती, तेव्हा त्याने त्यावर विश्वास दाखवला. ३०-४० रुपयांच्या किमतीला खरेदी केलेल्या शेअर्सनं नंतर १५ हजार कोटींहून अधिक नफा दिला.
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
'नेहमी गर्दीच्याविरुद्ध जा'
'नेहमी गर्दीविरुद्ध जा. जेव्हा सगळे विकत असतील तेव्हा खरेदी करा आणि जेव्हा सगळे खरेदी करत असतील तेव्हा विका.' हा त्यांचा सर्वात प्रसिद्ध मंत्र होता. झुनझुनवाला यांनी त्यांच्या रेअर एंटरप्रायझेस (रेखा आणि राकेश यांच्या नावाने स्थापन झालेल्या) फर्मद्वारे अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली. यामध्ये स्टार हेल्थ, मेट्रो ब्रँड्स, टाटा मोटर्स आणि क्रिसिल सारखी नावं समाविष्ट आहेत. १९९२ च्या सिक्युरिटीज घोटाळ्यापासून ते २००८ च्या जागतिक आर्थिक संकटापर्यंत प्रत्येक कठीण टप्प्यात त्यांनी मजबूत कंपन्यांवर विश्वास ठेवून आपली संपत्ती अनेक पटींनी वाढवली.
अकासाची सुरुवात
२०२१ मध्ये त्यांनी अकासा एअर सुरू केली. एका वर्षाच्या आत ती जगातील सर्वात वेगाने वाढणारी एअरलाइन बनली. २०२२ मध्ये त्यांनी या जगाचा निरोप घेतला.. २०२३ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. त्यांचा सर्वात मोठा वारसा म्हणजे केवळ संपत्ती नाही तर जर तुम्ही उत्कटतेनं आणि धैर्यानं गुंतवणूक केली तर भारताच्या विकासाच्या कथेवर पैज लावणे नेहमीच फायदेशीर ठरते हा विश्वास आहे.