Ola Electric Insider Trading: इनसाइडर ट्रेडिंगच्या बाबतीत ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडच्या अडचणी वाढू शकतात. बाजार नियामक सेबीनं ऑक्टोबर ते डिसेंबर २०२४ दरम्यान इनसाइडर ट्रेडिंगच्या दोन प्रकरणांमध्ये भाविश अग्रवाल यांच्या ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडची चौकशी सुरू केली आहे. एनडीटीव्हीनं सूत्रांच्या हवाल्यानं दिलेल्या वृत्तात ही माहिती दिली आहे. ओला इलेक्ट्रिकशी संबंधित पक्षाचे व्यवहारही सेबीच्या रडारवर असल्याचं रिपोर्टमध्ये म्हटलंय. या बातमीदरम्यान ओला इलेक्ट्रिकचे शेअर्स सेल मोडमध्ये पाहायला मिळाले. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी हा शेअर घसरून ४८.५३ रुपयांवर आला.
अनेक दिवसांपासून नकारात्मक बातम्या
गेल्या काही दिवसांपासून ओलाबाबत अनेक नकारात्मक बातम्या येत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मार्केट रेग्युलेटर सेबी फेब्रुवारीच्या विक्रीच्या आकडेवारीबाबत ओलानं दिलेल्या माहितीची सत्यता तपासत आहे.
सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
आकडेवारीतील फरकाची बाब काय?
ओला इलेक्ट्रिकच्या व्हेइकल पोर्टलच्या आकडेवारीनुसार, कंपनीनं फेब्रुवारीमध्ये ८,६०० युनिट्सची विक्री केली, ज्यामुळे त्यांचा बाजारातील हिस्सा जानेवारी २०२५ मधील २५ टक्क्यांवरून ११.४ टक्क्यांवर आला आहे. मात्र, ओला इलेक्ट्रिकनं शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटलंय, फेब्रुवारीमध्ये त्यांनी २५ हजार वाहनांची विक्री केली आणि बाजारातील त्यांचा हिस्सा २८ टक्के होता. यानंतर कंपनीला अवजड उद्योग मंत्रालय आणि रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून (एमओआरटीएच) ईमेल मिळाले आणि विक्रीच्या आकडेवारीत मोठी तफावत असण्याची कारणं विचारण्यात आली.
ओला इलेक्ट्रिकला आपल्या काही स्टोअर्सच्या ट्रेड सर्टिफिकेटसंदर्भात चार राज्यांमध्ये नोटिसा ही मिळाल्या असून त्यांना उत्तर देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं कंपनीने सांगितलं होतं. गेल्या आठवड्यात प्रसारमाध्यमांमध्ये ही बातमी आली होती की, ओलाला महाराष्ट्र सरकारकडून नोटीस मिळाली असून महाराष्ट्रातील १०० हून अधिक शोरूम तात्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ओला इलेक्ट्रिकनं मात्र अशा प्रकारच्या कोणत्याही नोटीसची माहिती नसल्याचं म्हटलं आहे.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)