Bharti Airtel Leadership : टेलिकॉम क्षेत्रातील दिग्गज कंपनी 'भारती एअरटेल'ने गुरुवारी आपल्या नेतृत्वामध्ये महत्त्वाच्या बदलांची घोषणा केली आहे. कंपनीचे विद्यमान 'सीईओ' गोपाळ विट्टल आता 'एक्झिक्युटिव्ह व्हाइस चेअरमन' म्हणून पदभार सांभाळणार असून, त्यांच्या जागी शाश्वत शर्मा यांची कंपनीचे नवीन 'मॅनेजिंग डायरेक्टर' आणि 'सीईओ' म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हे बदल १ जानेवारी २०२६ पासून लागू होतील.
कोण आहेत शाश्वत शर्मा?
शाश्वत शर्मा पुढील ५ वर्षांसाठी एअरटेल इंडियाचे नेतृत्व करतील. गेल्या वर्षभरापासून ते गोपाळ विट्टल यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असून सध्या ते 'सीईओ डेसिग्नेट' आणि 'कंज्युमर बिझनेस'चे प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. यापूर्वी त्यांनी 'चीफ ऑपरेटिंग ऑफिसर' म्हणून ऑपरेशन्स हाताळले आहेत. कंपनीच्या प्रत्येक विभागात त्यांनी दिलेली ठोस कामगिरी लक्षात घेऊन ही पदोन्नती देण्यात आल्याचे एअरटेलने स्पष्ट केले आहे.
गोपाळ विट्टल यांच्याकडे 'ग्रुप लेव्हल'ची धुरा
दीर्घकाळ एअरटेलचे यशस्वी नेतृत्व करणारे गोपाळ विट्टल आता संपूर्ण एअरटेल ग्रुपची देखरेख करतील. डिजिटल, तंत्रज्ञान, नेटवर्क प्लॅनिंग, खरेदी आणि टॅलेंट मॅनेजमेंट यांसारख्या विभागांमध्ये अधिक चांगला ताळमेळ बसवण्यावर त्यांचा भर असेल. कंपनीला भविष्यातील आव्हानांसाठी सज्ज करणे आणि ग्रुपची मोठी धोरणे आखणे हे त्यांचे मुख्य कार्य असेल. यासोबतच, विद्यमान सीएफओ सौमेन रे यांची आता 'ग्रुप सीएफओ' म्हणून नियुक्ती करण्यात आली असून ते थेट गोपाळ विट्टल यांना रिपोर्ट करतील.
वाचा - ३० वर्षानंतर जपानने वाढवले व्याजदर! 'कॅरी ट्रेड' कोसळण्याची भीती; जागतिक शेअर बाजारांवर मंदीचे सावट?
"बदल आणि सातत्य यांचा मेळ" - सुनील मित्तल
एअरटेलचे चेअरमन सुनील भारती मित्तल यांनी या बदलांबाबत समाधान व्यक्त केले आहे. ते म्हणाले, "एअरटेलमधील हे नेतृत्व परिवर्तन अगदी योग्य वेळी झाले आहे. येथे बदल आणि सातत्य दोन्ही हातात हात घालून चालतील. गोपाळ आणि शाश्वत कंपनीच्या विकासाची गती पुढील स्तरावर नेतील, असा मला पूर्ण विश्वास आहे."
