Bharat Dynamics Share News : आठवड्याच्या शेवटच्या दिवशी, म्हणजेच शुक्रवारी भारतीय शेअर बाजारात निराशाजनक वातावरण आहे. प्रमुख बेंचमार्क निर्देशांक बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी ५० लाल निशाणीवर ट्रेड करत आहेत. मात्र, या घसरणीच्या वातावरणातही एका संरक्षण क्षेत्रातील कंपनीच्या शेअर्सने रॉकेटच्या वेगाने उसळी घेतली आहे. ही कंपनी आहे भारत डायनेमिक्स.
२००० कोटींच्या ऑर्डरचा परिणाम
सकाळी ११:३० च्या सुमारास, बीएसईवर भारत डायनेमिक्सचा शेअर १,६०८.४५ रुपयांवर ट्रेड करत होता. यात ५.९३ टक्के (९० रुपये) इतकी मोठी वाढ दिसून आली. कंपनीच्या स्टॉकने व्यवहाराची सुरुवात हिरव्या निशाणीवर १,५९०.१० रुपयांवर केली होती. कंपनीच्या शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक २,०९६ आहे, तर नीचांक ८९७.१५ रुपये आहे.
तेजीमागील मुख्य कारणे
गुरुवारी कंपनीला २,००० कोटी रुपयांच्या 'इनवार अँटी-टँक क्षेपणास्त्रां'ची मोठी ऑर्डर मिळाली आहे. सप्टेंबर महिन्यात संपलेल्या तिमाहीत कंपनीचे आर्थिक निकाल अत्यंत मजबूत*राहिले. पुरवठा साखळीतील सुधारणांमुळे कंपनीच्या कामाला गती मिळाली, ज्यामुळे निकालांना बळ मिळाले.
ब्रोकरेज फर्मचा विश्वास
मोतीलाल ओसवाल या ब्रोकरेज फर्मच्या अहवालानुसार, भारत डायनेमिक्सच्या शेअर्समध्ये पुढील एका वर्षात ३२ टक्क्यांपर्यंत तेजी येऊ शकते. फर्मने या शेअरसाठी खरेदीचा सल्ला कायम ठेवला असून, लक्ष्य भाव १,९०० रुपयांवरून वाढवून २,००० रुपये केली आहे. ब्रोकरेज फर्मने असा अंदाज व्यक्त केला आहे की, कंपनीच्या नफ्यात येत्या तीन वर्षांत मोठी वाढ दिसून येईल.
संरक्षण क्षेत्रातील 'आत्मनिर्भर भारत' धोरणांना मिळालेल्या गतीमुळे भारत डायनेमिक्ससारख्या कंपन्यांना चांगला फायदा होत असल्याचे दिसत आहे.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातीलगुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
