Auto LPG Price Hike : मध्य पूर्वेतील युद्धाची झळ आता थेट सर्वसामान्यांच्या खिशाला बसू लागली आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून, कच्च्या तेलासह गॅसच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. याचा मोठा फटका कर्नाटकची राजधानी बेंगळुरूला बसला असून, येथे ऑटो एलपीजीच्या दरात एकाच दिवसात ११.७८ रुपयांची प्रचंड वाढ झाली आहे.
दोन आठवड्यांत १२ रुपयांची वाढ
बेंगळुरूमध्ये ऑटो एलपीजीचे दर आता ८९.५२ रुपये प्रति लीटर या ऐतिहासिक स्तरावर पोहोचले आहेत. अवघ्या दोन आठवड्यांपूर्वी, म्हणजेच २० मार्च रोजी हा दर ७७.७४ रुपये प्रति लीटर होता. सरकारी कंपन्यांनी (IOC, BPCL, HPCL) अधिकृत दर ८९.५२ रुपये ठरवला असला, तरी टंचाईचा फायदा घेत अनेक खाजगी पंप चालक १०० ते १०६ रुपये दराने विक्री करत आहेत.
पुरवठा साखळी विस्कळीत
२८ फेब्रुवारी २०२६ रोजी इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर ओलांडलेल्या 'हार्मुज स्ट्रेट' मधील शिपिंग सेवा विस्कळीत झाली आहे.
एका खाजगी डीलरने दिलेल्या माहितीनुसार
गेल्या आठवड्यात एक टन एलपीजीची किंमत ६० हजार रुपये होती, जी आता थेट १.९० लाख रुपयांवर पोहोचली आहे. पुरवठा कमी झाल्यामुळे अनेक गॅस स्टेशन्स बंद पडण्याच्या मार्गावर आहेत, तर सुरू असलेल्या स्टेशन्सबाहेर २-२ किलोमीटर लांब रांगा लागत आहेत.
वाचा - LIC च्या पैशांवर 'रिलायन्स'चा डल्ला? सीबीआयकडून अनिल अंबानींविरोधात चौथा खटला दाखल
रिक्षाचालक आणि मध्यमवर्गीयांचे कंबरडे मोडले
'ऑटो ड्रायव्हर्स युनियन'च्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, दरवाढीमुळे रिक्षाचालकांचे मोठे नुकसान होत आहे. अधिकृत दरापेक्षा १५-२० रुपये जास्त मोजावे लागत असल्याने रोजचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे. याची झळ आता महाराष्ट्रात देखील पाहायला मिळू शकते.
