Astronomer CEO : मित्रांसोबत संगीत कार्यक्रमाला जातो असं बायकोला सांगून, कंपनीच्या महिला एचआर हेडला सोबत घेऊन जाणं एका प्रसिद्ध कंपनीच्या सीईओंना चांगलंच महागात पडलं आहे. कोल्डप्लेच्या कॉन्सर्टमध्ये एकमेकांना मिठी मारतानाचा त्यांचा 'किस कॅम' व्हिडिओ व्हायरल झाल्याने हा भांडाफोड झाला आहे. आता हा व्हिडिओ जगभर चर्चेचा विषय बनला आहे.
अॅस्ट्रोनॉमर या कंपनीचे सीईओ अँडी बायरन आणि त्यांच्या कंपनीच्या एचआर प्रमुख क्रिस्टिन कॅबोट यांचा हा व्हिडिओ आहे. मॅसॅच्युसेट्समधील कोल्डप्लेच्या कॉन्सर्टमध्ये ही घटना घडली, जी आता बँडच्या परफॉर्मन्सपेक्षा जास्त व्हायरल झाली आहे.
'किस कॅम'मध्ये पकडले गेले आणि झाले व्हायरल!
व्हायरल व्हिडिओमध्ये कॉन्सर्टमध्ये नेहमीप्रमाणे 'किस कॅम' चालू होता. कॅमेरा फिरत असताना अचानक तो एका पुरुष आणि महिलेवर स्थिरावला, जे एकमेकांना मिठी मारत होते. जम्बोट्रॉनवर (मोठ्या स्क्रीनवर) त्यांना पाहताच, बँडचा मुख्य गायक क्रिस मार्टिन देखील अनवधानाने त्यांच्याकडे लक्ष वेधताना दिसतो.
कॅमेरा त्यांच्यावर थांबलेला पाहून, दोघेही लगेच वेगळे झाले आणि आपले चेहरे झाकण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. हा क्षण लगेचच एक्स (पूर्वीचे ट्विटर), टिकटॉक आणि इंस्टाग्रामवर तुफान व्हायरल झाला, ज्यामुळे ऑनलाइन जगतात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले. नंतर या जोडप्याची ओळख अँडी बायरन आणि क्रिस्टिन कॅबोट अशी झाली.
अँडी बायरनच्या 'व्हायरल' विधानात काय लिहिले आहे?
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अँडी बायरनच्या नावावर एक 'कथित' निवेदन सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यात लिहिले होते. "मी ऑनलाइन प्रसारित होणाऱ्या या क्षणाची आणि त्यामुळे निर्माण झालेल्या निराशेची कबुली देऊ इच्छितो. संगीत आणि आनंदाची रात्र असायला हवी होती ती एका सार्वजनिक व्यासपीठावर माझ्या वैयक्तिक चुकीमध्ये बदलली. मी माझ्या पत्नीची, माझ्या कुटुंबाची आणि अॅस्ट्रोनॉमरच्या टीमची मनापासून माफी मागू इच्छितो. एक जोडीदार म्हणून, एक वडील म्हणून आणि एक नेता म्हणून तुम्ही माझ्याकडून अधिक चांगल्या गोष्टींना पात्र आहात."
या विधानात, पुढे असेही म्हटले होते की, "मी वैयक्तिक आणि व्यावसायिकदृष्ट्या विचार करण्यासाठी, जबाबदारी घेण्यासाठी आणि पुढील पावले उचलण्यासाठी वेळ काढत आहे. मी त्या प्रक्रियेत गोपनीयतेची विनंती करतो. माझ्या संमतीशिवाय खाजगी क्षण सार्वजनिक होणे किती त्रासदायक आहे, हे मी व्यक्त करतो. एखादाचं खाजगी आयुष्याचा असा तमाशा करणे योग्य आहे का? यावर नक्की विचार करावा." दरम्यान, आम्ही या विधानाची सत्यता पडताळू शकलो नाही.
अँडी बायरन कोण आहेत?
अँडी बायरन हे जुलै २०२३ पासून अॅस्ट्रोनॉमर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, त्यांना कॉर्पोरेटमधील मोठा अनुभव आहे. सार्वजनिक नोंदीनुसार, बायरन आणि त्यांची पत्नी मेगन केरिगन जवळच्या नॉर्थबरोमध्ये राहतात आणि त्यांना दोन मुले आहेत.
वाचा - वडापाव, समोसा... आता वर्तमानपत्रात गुंडाळल्यास दुकान बंद? 'या' चुकीमुळे ७५ वर्षांची बेकरी झाली सील!
'न्यूजवीक'ने दिलेल्या वृत्तानुसार, अॅस्ट्रोनॉमर ही एक खाजगी डेटा इन्फ्रास्ट्रक्चर स्टार्टअप कंपनी आहे, जिने २०२२ मध्ये १ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त मूल्यांकनासह प्रतिष्ठित "युनिकॉर्न" दर्जा प्राप्त केला आहे. कंपनीने अलीकडेच आपले मुख्यालय न्यू यॉर्क शहरात हलवले आहे. या व्हायरल व्हिडिओमुळे बायरन यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात काय घडामोडी होतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.