Apple COO : उत्तर प्रदेशातील मुरादाबादच्या मातीत वाढलेला एक सामान्य तरुण आज जगातील सर्वात मौल्यवान टेक कंपनी 'ॲपल'मध्ये दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वोच्च पदावर विराजमान आहे. ॲपलचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर सबीह खान हे सध्या त्यांच्या भरघोस पगारामुळे जागतिक चर्चेचा विषय ठरले आहेत. कंपनीने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, खान यांना २०२५ या वर्षासाठी एकूण २३४ कोटी रुपयांचे मानधन मिळाले आहे.
जेफ विल्यम्स यांची घेतली जागा
गेल्या वर्षी जुलै महिन्यात ॲपलने सबीह खान यांच्या खांद्यावर सीओओ पदाची मोठी जबाबदारी सोपवली होती. त्यांच्या आधी जेफ विल्यम्स हे पद सांभाळत होते. सबीह खान यांचा जन्म १९६६ मध्ये मुरादाबादमधील पॉश 'सिव्हिल लाइन्स' परिसरात झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मुरादाबादच्या सेंट मॅरी स्कूलमध्ये (इयत्ता ५ वी पर्यंत) झाले. लहानपणापासून अत्यंत साधे आणि अभ्यासू असलेले सबीह मोजक्या मित्रांच्या वर्तुळात वावरणारे विद्यार्थी म्हणून ओळखले जात.
इंजिनीअर वडिलांचा वारसा आणि जागतिक भरारी
सबीह खान यांचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या सक्षम होते, कारण त्यांचे वडीलही व्यवसायाने इंजिनीअर होते. प्राथमिक शिक्षणानंतर त्यांचे कुटुंब सिंगापूरला स्थायिक झाले आणि सबीह यांचे पुढील शिक्षण तिथेच पूर्ण झाले. सध्या त्यांचे एक भाऊ लंडनमध्ये तर दुसरे सिंगापूरमध्ये स्थायिक आहेत.
मुरादाबादशी आजही घट्ट नातं
परदेशात स्थायिक होऊनही सबीह खान यांचे मुरादाबादशी असलेले नाते तुटलेले नाही. त्यांच्या नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, एवढ्या मोठ्या हुद्द्यावर असूनही जेव्हा ते मुरादाबादला येतात, तेव्हा सर्वांशी अत्यंत प्रेमाने आणि साधेपणाने वागतात. सुमारे १६ वर्षांपूर्वी ते एका कौटुंबिक लग्नासाठी मुरादाबादला आले होते, तेव्हा त्यांची मित्र आणि नातेवाईकांशी भेट झाली होती. मुरादाबादमधील त्यांच्या वडिलोपार्जित घरात आजही त्यांचे नातेवाईक राहतात, जे तिथे एक हॉटेल आणि नामांकित इंग्लिश मीडियम स्कूल चालवतात.
वाचा - भारताला जागतिक धक्का! १० शक्तिशाली देशांच्या यादीतून नाव गायब; रँकिंगमध्ये देश कितव्या स्थानी?
ॲपलच्या ऑपरेशन्सचे 'कॅप्टन'
सबीह खान यांच्याकडे ॲपलच्या जागतिक सप्लाय चेन, उत्पादनांची गुणवत्ता आणि ऑपरेशन्सची संपूर्ण जबाबदारी आहे. विशेषतः आयफोन आणि इतर उत्पादनांच्या निर्मिती प्रक्रियेत त्यांचा मोठा वाटा असतो. भारतासारख्या देशात ॲपलने जो उत्पादन विस्तार सुरू केला आहे, त्यामागे सबीह खान यांची रणनीती महत्त्वाची मानली जाते.
