IT Sector : अमेरिकेतून आलेल्या एका बातमीमुळे भारतीय आयटी कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत. आज बाजार उघडताच इन्फोसिस, विप्रोसारख्या कंपन्यांचे शेअर्स धडाधड आपटले आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रातील दिग्गज कंपनी अँथ्रोपिकने आपल्या 'क्लॉड कोवर्क' या नव्या एजंटसाठी ११ प्लग-इन्स लाँच करताच जागतिक शेअर बाजारात खळबळ उडाली आहे. हा नवा AI असिस्टंट कायदेशीर कामे, विक्री आणि मार्केटिंगची कामे स्वयंचलित करणार असल्याने, पारंपारिक सॉफ्टवेअर आणि आयटी सेवा देणाऱ्या कंपन्यांचे अस्तित्व धोक्यात आल्याची भीती निर्माण झाली आहे. या बातमीमुळे जगभरातील गुंतवणूकदारांनी टेक शेअर्सची जोरदार विक्री सुरू केली असून, यात भारतीय आयटी कंपन्यांचेही कोट्यवधी रुपये बुडाले आहेत.
सॉफ्टवेअर कंपन्यांचे मरण?
ब्रोकरेज फर्म जेफरीजने या परिस्थितीला ‘सासपोकॅलिप्स’ असे नाव दिले आहे. याचा अर्थ सॉफ्टवेअर-एज-अ-सर्व्हिस देणाऱ्या कंपन्यांसाठी हा प्रलय ठरू शकतो. क्लॉडचा नवा 'लीगल एजंट' आता कागदपत्रांचे पुनरावलोकन, कंप्लायन्स चेक आणि कायदेशीर मसुदे तयार करण्याचे काम स्वस्त आणि जलद करणार आहे. पूर्वी ज्या कामांसाठी सेल्सफोर्स किंवा सर्व्हिसनाऊ सारख्या प्लॅटफॉर्मची गरज लागायची, ती कामे आता क्लॉड थेट त्या सिस्टमशी जोडून स्वतः करू शकणार आहे.
शेअर बाजारात पडझड
अँथ्रोपिकच्या या घोषणेनंतर अमेरिका आणि युरोपमधील टेक कंपन्यांचे शेअर्स पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळले.
| कंपनीचे नाव | घसरण (%) |
| लीगलझूम | २०% |
| गार्टनर | २१% |
| पेपल | २०% |
| थॉमसन रॉयटर्स | १५.५% |
| सर्व्हिसनाऊ | ७% |
| सेल्सफोर्स | ६.८% |
भारतीय आयटी कंपन्यांनाही धसका
भारतीय कंपन्यांचा महसूल प्रामुख्याने अमेरिका आणि युरोपमधील आउटसोर्सिंगवर अवलंबून आहे. या भीतीपोटी भारतीय आयटी शेअर्समध्येही मोठी विक्री झाली.
- इन्फोसिस : ५.५% घसरण
- विप्रो : ४.८% घसरण
- कॉग्निझंट : १०% घसरण
- एसेंचर : ९.५% घसरण
गुंतवणूकदारांसाठी धोक्याची घंटा
पूर्वी असा समज होता की एआयमुळे या कंपन्यांची कार्यक्षमता वाढेल. मात्र, आता एआय थेट या कंपन्यांचे कामच हिरावून घेईल, अशी भीती गुंतवणूकदारांना सतावत आहे. जर डेटा प्रोसेसिंग आणि कॉन्ट्रॅक्ट रिव्ह्यू यांसारखी कामे एआयने अत्यंत कमी खर्चात केली, तर आउटसोर्सिंग कंपन्यांना मिळणाऱ्या ऑर्डरमध्ये मोठी घट होऊ शकते.
