Anil Ambani Loan Fraud Case : रिलायन्स ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अनिल अंबानी यांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालय (ED) आता आणखी कठोर पाऊले उचलत आहे. अनिल अंबानींना समन्स बजावल्यानंतर, आता ईडी काही प्रमुख बँकांच्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची तयारी करत आहे. याचा थेट संबंध अनिल अंबानींच्या कंपन्यांशी संबंधित १७,००० कोटी रुपयांच्या कथित कर्ज घोटाळ्याशी आहे.
ED ने बँकांना पाठवले पत्र
एनडीटीव्ही प्रॉफिटच्या वृत्तानुसार, ईडीने देशातील जवळपास १२-१३ बँकांना पत्र पाठवले आहे. यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, ॲक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, यूको बँक आणि पंजाब अँड सिंध बँक यांसारख्या प्रमुख बँकांचा समावेश असण्याची शक्यता आहे.
ईडीने या बँकांकडून रिलायन्स हाऊसिंग फायनान्स, रिलायन्स कम्युनिकेशन्स आणि रिलायन्स कमर्शियल फायनान्स यांना कर्ज देण्याच्या प्रक्रियेची, डिफॉल्टच्या वेळेची आणि कर्ज वसुलीसाठी केलेल्या कारवाईची सविस्तर माहिती मागवली आहे. जर या बँकांकडून मिळालेल्या लेखी उत्तरातून समाधानकारक माहिती मिळाली नाही, तर बँक अधिकाऱ्यांना चौकशीसाठी समन्स बजावले जाऊ शकते.
अनिल अंबानींची आज चौकशी
अनिल अंबानी यांच्या कंपन्यांशी संबंधित १७,००० कोटी रुपयांच्या कथित कर्ज घोटाळ्या प्रकरणी ईडीने त्यांना ५ ऑगस्ट रोजी चौकशीसाठी बोलावले आहे. यापूर्वी, ईडीने मुंबईत अनिल अंबानींच्या रिलायन्स ग्रुपशी संबंधित ३५ ठिकाणी छापे टाकले होते, ज्यामध्ये सुमारे ५० कंपन्या आणि २५ व्यक्तींचा समावेश होता.
बनावट बँक हमीचा आरोप
ईडीच्या म्हणण्यानुसार, चौकशीदरम्यान असे समोर आले की अनिल अंबानींच्या कंपनीने सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला ६८.२ कोटी रुपयांची बनावट बँक हमी सादर केली होती. ही हमी अनिल अंबानींच्या एडीएजी ग्रुप, मेसर्स रिलायन्स एनयू बेस लिमिटेड आणि मेसर्स महाराष्ट्र एनर्जी जनरेशन लिमिटेड या कंपन्यांच्या नावाने जारी करण्यात आली होती.
वाचा - 'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
बनावट हमी खरी आहे हे दाखवण्यासाठी, रिलायन्स समूहाने SECI शी संपर्क साधताना अधिकृत SBI डोमेन 'sbi.co.in' ची नक्कल करून 's-bi.co.in' हा बनावट ईमेल डोमेन वापरल्याचा आरोप आहे. ईडीने या बनावट डोमेनचा स्रोत शोधण्यासाठी नॅशनल इंटरनेट एक्सचेंज ऑफ इंडियाकडून डोमेन नोंदणीचे रेकॉर्ड्सही मागवले आहेत. या प्रकरणातील पुढील तपास महत्त्वपूर्ण ठरू शकतो.