Anil Ambani News: उद्योगपती अनिल अंबानी यांच्या कायदेशीर अडचणींमध्ये सातत्यानं वाढ होताना दिसत आहे. सक्तवसुली संचालनालयानं (ED) त्यांच्या मुंबईतील 'अबोड' या निवासस्थानावर जप्तीची कारवाई केल्यानंतर, आता सीबीआयनं (CBI) त्यांच्याविरुद्ध नवीन गुन्हा दाखल केलाय. हे प्रकरण बँक ऑफ बडोदाशी संबंधित २२२० कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या कथित कर्ज फसवणुकीचं आहे.
२०१३-१७ मधील कर्ज व्यवहारांवर कारवाई
बँक ऑफ बडोदानं दिलेल्या तक्रारीच्या आधारे सीबीआयनं हा गुन्हा दाखल केलाय. २०१३ ते २०१७ या कालावधीत रिलायन्स कम्युनिकेशन्सनं (RCom) घेतलेल्या कर्जाचा वापर मंजूर कारणांऐवजी इतर कारणांसाठी करण्यात आला, ज्यामुळे बँकेचं २,२२० कोटी रुपयांहून अधिक नुकसान झालं, असा आरोप आहे. सीबीआय प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हा दाखल झाल्यानंतर अंबानींचं निवासस्थान आणि कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयांवर छापे टाकण्यात आले असून, तेथून अनेक महत्त्वाची कागदपत्रं जप्त करण्यात आलीत.
YES Bank च्या प्रीपेड फॉरेक्स कार्डमध्ये कोट्यवधींची चोरी; CVV शिवाय हॅकर्सनं कसे लुटले पैसे?
काय आहेत आरोप?
आरकॉम आणि त्याच्याशी संबंधित कंपन्या 'रिलायन्स इन्फ्राटेल लिमिटेड' आणि 'रिलायन्स टेलिकॉम लिमिटेड' यांनी बँका आणि वित्तीय संस्थांकडून एकूण ३१,५८० कोटी रुपयांचे कर्ज घेतलं होतं, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या निधीचा मोठा हिस्सा इतर बँकांचे कर्ज फेडण्यासाठी, संबंधित घटकांना पैसे देण्यासाठी आणि तात्पुरत्या गुंतवणुकीसाठी वापरला गेल्याचा दावा केला जात आहे. फॉरेन्सिक ऑडिटमध्ये निधीचा अनधिकृत वापर आणि गैरवापर झाल्याचे संकेत मिळाले आहेत. कर्जाच्या रकमेचा वापर अटींनुसार न करता तो पद्धतशीरपणे वळवण्यात आल्याचा बँकेचा दावा आहे.
एनपीए ते फसवणुकीपर्यंतचा प्रवास
हे खातं ५ जून २०१७ रोजी 'नॉन-परफॉर्मिंग ॲसेट' (NPA) म्हणून घोषित करण्यात आलं होतं. त्यानंतर हे खातं फसवणुकीच्या श्रेणीत टाकण्याची प्रक्रिया सुरू झाली, ज्यावर मुंबई उच्च न्यायालयानं स्थगिती दिली होती. मात्र, ही स्थगिती २३ फेब्रुवारी रोजी उठवण्यात आली, त्यानंतर बँकेनं सीबीआयकडे तक्रार नोंदवली.
