work life balance : सरत्या वर्षात कार्पोरेट क्षेत्रात इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांच्या एका वक्तव्याची खूप चर्चा झाली. एकीकडे वर्क लाइफ बॅलन्ससाठी आग्रह धरला जात असताना नारायण मूर्ती यांचे विधान उलट होते. देशातील तरुणांनी आठवड्यातून ७० तास काम करायला हवे, असा सल्ला मूर्ती यांनी एका ठिकाणी बोलताना दिला. यानंतर त्यांच्यावर भरपूर टीका झाली. मात्र, त्यानंतरही ते आपल्या विधानावर ठाम आहेत. आता याच मुद्द्यावर देशातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि अब्जाधीश उद्योगपती गौतम अदानी यांनी आपलं मत व्यक्त केलंय.
वर्क-लाइफ बॅलन्सबाबत गौतम अदानी यांचा सल्ला
एएनआय या वृत्तसंस्थेने गौतम अदानी यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ते वर्क-लाइफ बॅलन्सबद्दल बोलत आहे. गौतम अदानी म्हणाले की वर्क लाइफ बॅलन्सबाबत प्रत्येकाचा विचार वेगळा असतो. एका व्यक्तीचे वर्क लाइफ बॅलन्स दुसऱ्यावर लादले जाऊ शकत नाही. त्याचप्रमाणे त्यांची काम करण्याची पद्धत इतर कोणावरही लादता येणार नाही. वास्तविक, काम आणि जीवनाचा समतोल असा असावा की तुम्ही आणि तुमचे कुटुंब दोघांनाही त्याचा आनंद मिळेल.
गौतम अदानी म्हणाले की, काही लोक कुटुंबासोबत ४ तास घालवतात, तर काही लोक ८ तास घालवतात. किती वेळ कुटुंबासोबत घालवता हे महत्त्वाचे नसून त्यावेळी तुम्ही किती आनंदी असता हे महत्त्वाचं आहे. हे ज्याला जमलं त्याचे काम आणि जीवनाचा समतोल आहे.
कुटुंब आणि कामाशिवाय जीवन नाही
गौतम अदानी म्हणाले की, कुटुंब असो की नोकरी, दोघांशिवाय जीवन नाही. त्यामुळे, तुम्ही करत असलेल्या कामाचा आनंद घेताना योग्य वर्क लाइफ बॅलन्स असते. तुमच्या कुटुंबातील मुलंही या गोष्टी पाहतात आणि मग तेच शिकतात. गौतम अदानी यांचा हा सल्ला महत्त्वाचा आहे. कारण, वर्क फाइफ बॅलन्सची देशातच नाही तर जगभर चर्चा सुरू आहे.