America Iran Tariff: अमेरिकेनं पुन्हा एकदा टॅरिफचा शस्त्र म्हणून वापर करत जागतिक व्यापारात खळबळ माजवून दिली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत व्यापार करणाऱ्या देशांवर २५ टक्के अतिरिक्त टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे. त्यांनी हा निर्णय त्वरित प्रभावी आणि अंतिम असल्याचं म्हटलंय. अशा परिस्थितीत, ज्या देशांचे इराणशी आर्थिक संबंध आहेत, ते देखील या दबावाखाली येतील का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. इराणशी जुने आणि धोरणात्मक व्यापारी संबंध असलेल्या देशांमध्ये भारताचाही समावेश आहे.
भारत-इराण व्यापाराची स्थिती
वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये भारत आणि इराणमधील द्विपक्षीय व्यापार सुमारे १.६८ अब्ज डॉलर राहिला. यामध्ये भारतानं सुमारे १.२४ अब्ज डॉलरची निर्यात केली, तर इराणकडून ०.४४ अब्ज डॉलरची आयात झाली. म्हणजेच, भारताला या व्यापारात सुमारे ०.८० अब्ज डॉलरचा ट्रेड सरप्लस (व्यापारी नफा) मिळाला. मात्र, ही आकडेवारी मागील वर्षांच्या तुलनेत खूपच कमी आहे. २०१८-१९ मध्ये भारत-इराण व्यापार सुमारे १७ अब्ज डॉलरच्या शिखरावर होता, जो अमेरिकेच्या निर्बंधांनंतर वेगानं आकुंचन पावला.
Wife सोबत मिळून पोस्टाच्या ‘या’ स्कीममध्ये करा गुंतवणूक; महिन्याला मिळेल ₹९२५० चं फिक्स व्याज
आयात-निर्यातीचा तपशील
भारत इराणकडून प्रामुख्याने पेट्रोलियम गॅस, पेट्रोलियम कोक, केमिकल्स, सुका मेवा, सफरचंद आणि बिटुमेन यांसारख्या उत्पादनांची आयात करतो. दुसरीकडे, भारताकडून इराणला होणाऱ्या प्रमुख निर्यातीमध्ये बासमती तांदूळ, चहा, साखर, केळी, औषधे, डाळी आणि मांस उत्पादनांचा समावेश आहे. विशेषतः भारतीय बासमती तांदळासाठी इराण ही एक मोठी बाजारपेठ आहे, ज्याच्याशी लाखो शेतकऱ्यांची उपजीविका जोडलेली आहे.
भारतावर होणारा संभाव्य परिणाम
इराणशी व्यापार करणाऱ्या देशांच्या अमेरिकेसोबतच्या व्यापारावर हा टॅरिफ लागू होईल. भारत हा इराणचा तिसरा सर्वात मोठा व्यापारी भागीदार असल्यानं, याचा परिणाम भारताच्या अमेरिकेला होणाऱ्या निर्यातीवरही होऊ शकतो, अमेरिकन सरकारनं अद्याप परिस्थिती पूर्णपणे स्पष्ट केलेली नाही. अमेरिकेने भारतावर आधीच ५०% टॅरिफ लावला आहे. जर इराणशी व्यापार केल्यामुळे अतिरिक्त २५% कर लावला गेला, तर एकूण टॅरिफ ७५% पर्यंत पोहोचू शकतो. यामुळे अमेरिकेत भारतीय वस्तू महाग होतील, निर्यात घटेल आणि अर्थव्यवस्थेवर दबाव वाढेल. कंपन्या जोखीम टाळण्याचा प्रयत्न करतील, त्यामुळे इराणकडून होणारी आयातही प्रभावित होऊ शकते. मात्र, अमेरिकेच्या निर्बंधांमुळे भारताचा इराणशी होणारा बहुतांश व्यापार थेट नसून तिसऱ्या देशांमार्फत होतो, ज्यामुळे याचा प्रभाव मर्यादित राहू शकतो. भारतानं यापूर्वीच पर्यायी मार्ग स्वीकारले आहेत. रशियाप्रमाणे इराणकडूनही तेल खरेदी सुरू राहू शकते, परंतु त्याचा खर्च वाढेल.
