नवी दिल्ली : अब्जाधीश उद्योगपती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी हे कित्येक वर्षांपासून आपल्या औद्योगिक साम्राज्यांचा विस्तार करीत आहेत. तथापि, आजपर्यंत ते एकमेकांशी मुकाबला करण्यापासून दूर राहिले होते. ५जी दूरसंचार सेवेच्या स्पेक्ट्रम लिलावाच्या निमित्ताने हे दोघे आमने-सामने येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अंबानी आणि अदानी हे दोघेही गुजराती आहेत. दोघांत राजकीय पातळीवरही काही संघर्ष नाही. दोघांची व्यावसायिक क्षेत्रे भिन्न आहेत. तथापि, अदानी समूह दूरसंचार स्पेक्ट्रम लिलावात सहभागी होणार असल्याची बातमी शनिवारी आली. अंबानी हे रिलायन्स जिओच्या रूपाने आधीच या क्षेत्रात आहेत. त्यामुळे दोघे एकमेकांचे प्रतिस्पर्धी बनणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या.
अदानी समूहाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले की, ५जी दूरसंचार स्पेक्ट्रमचा वापर आम्ही विमानतळ, बंदरे व लाॅजिस्टिक तसेच वीज उत्पादन, पारेषण, वितरण आणि विभिन्न वस्तू उत्पादन कार्यातील सायबर सुरक्षा तसेच खासगी नेटवर्क सेवा उपलब्ध करून देण्यासाठी करणार आहोत. याचाच अर्थ अदानी समूह ग्राहक मोबाईल सेवा क्षेत्रात प्रवेश करणार नाही. या क्षेत्रात रिलायन्स जिओ सर्वांत मोठी कंपनी आहे.
वास्तविक खासगी कॅप्टिव्ह नेटवर्कसाठी बिगर-दूरसंचार कंपन्यांना स्पेक्ट्रम वितरित करण्यास दूरसंचार कंपन्यांनी कडवट विरोध केला होता. कॅप्टिव्ह नेटवर्कमुळे आपल्या व्यवसायावर गंभीर परिणाम होईल, अशी भीती दूरसंचार कंपन्यांना वाटते. बिगर-दूरसंचार कंपन्यांनी आपल्याकडून स्पेक्ट्रम भाडेपट्ट्यावर घ्यावे, असे दूरसंचार कंपन्यांचे म्हणणे होते. तथापि, भारत सरकारने त्यांचे ऐकले नाही. २६ जुलै रोजी ५जी दूरसंचार स्पेक्ट्रम लिलाव होईल. त्यासाठी निविदा भरण्याची मुदत शुक्रवारी संपली. जियो, एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया या तीन दूरसंचार कंपन्यांबरोबरच अदानी समूहाने चौथा स्पर्धक बनून निविदा भरली आहे.
किती कोटी लागणार?
अदानी समूहाने राष्ट्रीय दीर्घ अंतर (एनएलडी) आणि आंतरराष्ट्रीय दीर्घ अंतर (आयएलडी) यांसाठी अलीकडेच परवाने मिळविले आहेत. २६ जुलै २०२२ रोजी किमान ४.३ लाख कोटी रुपयांच्या एकूण ७२,०९७.८५ मेगाहर्ट्ज स्पेक्ट्रमचा लिलाव होणार आहे.
