akash bobba : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांच्याविषयी नव्याने सांगायला नको. मस्क हे जगातील सर्वात यशस्वी उद्योजक मानले जातात. अंतराळ सहलीसारख्या भन्नाट कल्पना सत्यात उतरवण्यासाठी मस्क प्रसिद्ध आहेत. शिवाय अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे ते खंदे समर्थक आहेत. यामुळेच त्यांना सरकारमध्ये स्थान देण्यात आलं आहे. इलॉन मस्क यांनी आपल्या सरकारी कार्यक्षमता विभागासाठी ६ तरुण अभियंत्यांची नियुक्ती केली आहे. ज्यात भारतातील २२ वर्षीय आकाश बोब्बा याचाही समावेश आहे. या घटनेनंतर आकाश बोब्बा चर्चेत आला आहे.
भारतीय वंशाचा अभियंता आकाश बोब्बा याची इलॉन मस्कच्या सरकारी कार्यक्षमता विभागाद्वारे नियुक्त केलेल्या ६ तरुण अभियंत्यांमध्ये निवड झाली आहे. १९ ते २४ वयोगटातील या ६ अभियंत्यांनी संवेदनशील शासकीय यंत्रणेत कथितरित्या प्रवेश केल्यानंतर सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं आहे. आकाश बोब्बा याची ओपीएमवर पोस्टींग आहे. तो थेट नवनिर्वाचित चीफ ऑफ स्टाफ अमांडा स्केलला रिपोर्ट करतो. एवढ्या लहान वयात UC बर्कले येथे टॉप कोडर म्हणून सुरुवात करुन सरकारमध्ये प्रमुख स्थानावर पोहोचणे ही देशासाठीही मोठी गोष्ट आहे.
आकाश बोब्बा कोण आहे?
आकाश बोब्बा याने अलीकडेच चर्चेत आल्यानंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लिंक्डइनवरून त्याचे प्रोफाइल काढून टाकले आहे. पण, अहवालानुसार, तो यूसी बर्कले येथील प्रतिष्ठित व्यवस्थापन, उद्योजकता आणि तंत्रज्ञान कार्यक्रमाचा भाग होता. त्याने मेटा, पलांटीर आणि प्रसिद्ध हेज फंड ब्रिजवॉटर असोसिएट्ससह आघाडीच्या टेक कंपन्यांमध्ये इंटर्न म्हणून काम केलं आहे. तांत्रिक ज्ञानाव्यतिरिक्त, त्यांच्याकडे बायोडेटा एआय, डेटा ॲनालिटिक्स आणि फायनान्शियल मॉडेलिंगमध्ये कौशल्य आहे.
आकाश बोब्बा का चर्चेत आला?
आकाश बोब्बा याचा वर्गमित्र चॅरिस झांगने सोशल मीडियावर बर्कलेमध्ये घडलेल्या एका घटनेबद्दल लिहिले आहे. बर्कलेमधील एका प्रोजेक्टदरम्यान माझ्याकडून चुकून आमचा संपूर्ण कोडबेस डिलीट झाला. यानंतर मी खूप घाबरलो होतो. पण आकाशने फक्त स्क्रीनकडे पाहिले आणि काळजी करू नका. मी करुन देतो असं सांगितले. त्याने एका रात्रीत सुरवातीपासून सर्वकाही लिहिले. जे पूर्वीपेक्षाही चांगले होते. आम्ही ते वर्गात सादर केल्यानंतर आमचा प्रथम क्रमांक आला. यानंतर आकाश सोशल मीडिया सेन्सेशन झाला आहे.