Tata Air India : टाटा समूह म्हटलं की ब्रँड आणि विश्वासार्हता हे दोन शब्द ओठांवर आपसूक येतात. टाटा म्हटलं की लोक डोळे झाकून विश्वास ठेवतात. मात्र, या प्रतिमेला आता एका कंपनीच्या सेवेने धक्का बसला आहे. टाटा समूहाची विमान कंपनी एअर इंडिया याला कारणीभूत आहे. ताज्या प्रकरणात ऑस्ट्रेलियन क्रिकेटर डेव्हिड वॉर्नरने यावरुन सोशल मीडियावर आपला संताप व्यक्त केला. यापूर्वी खासदार सुप्रिया सुळे आणि केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांनाही असाच अनुभव आला होता. या नेत्यांनीही सोशल मीडियावरुन कंपनीच्या सेवेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं.
डेव्हिड वॉर्नरसोबत काय घडलं?
ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू सध्या इंडियन प्रीमियर लीगसाठी भारतात आहे. शनिवारी (२२ मार्च) त्याला विचित्र परिस्थितीचा सामना करावा लागला. वॉर्नर वैमानिकांशिवाय एअर इंडियाच्या विमानात चढला. यानंतर त्याला खूप वेळ तसेच विमानात बसून राहावे लागले. एअरलाइनने सांगितले की, बेंगळुरू विमानतळावर खराब हवामानामुळे फ्लाइट क्रूला येण्यास उशीर झाला. या घटनेमुळे विमान कंपनीचे कामकाज आणि प्रवासी व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
@airindia we’ve boarded a plane with no pilots and waiting on the plane for hours. Why would you board passengers knowing that you have no pilots for the flight? 🤦♂️🤦♂️
— David Warner (@davidwarner31) March 22, 2025
एअर इंडियाचे स्पष्टीकरण
डेव्हिड वॉर्नरने 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपला राग व्यक्त केला. त्याने लिहिले, की 'आम्ही वैमानिकांशिवाय विमानात चढलो. पण, खूप वेळ विमानातच बसून राहावे लागले. तुमच्याकडे उड्डाणासाठी वैमानिक नसताना तुम्ही प्रवासी विमानात का चढवले? यावर एअर इंडियाने स्पष्टीकरण दिलं. बेंगळुरूमधील खराब हवामानामुळे अनेक विमाने वळवण्यात आली. तर काही उड्डाणे उशिरा झाली. एअरलाइनने पुढे लिहिले की, 'तुमचे विमान चालवणारे क्रू देखील अशाच अडचणीत सापडल्याने उड्डाणाला उशीर झाला.
सुप्रिया सुळे यांनीही केली होती टीका
वॉर्नरच्या आधी सुप्रिया सुळे यांनी एअर इंडियाच्या सेवेबद्दल नाराजी व्यक्त केली होती. एअर इंडियाचे विमान AI0508 एक तास १९ मिनिटे उशिराने निघाल्याने त्यांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली होती. एवढे महागडे भाडे देऊनही विमान वेळेवर निघत नाही, असा सवाल त्यांनी केला. विलंबासाठी एअर इंडियाला जबाबदार धरण्याची मागणी त्यांनी नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडू यांच्याकडे केली.
Air India flights are endlessly delayed — this is unacceptable! We pay premium fares, yet flights are never on time. Professionals, children, and senior citizens — all affected by this constant mismanagement. Urging the Civil Aviation Minister to take action and hold Air India… pic.twitter.com/FmcJ8HR667
— Supriya Sule (@supriya_sule) March 21, 2025
टाटा समूहात येऊनही सेवा सुधारली नाही?
२०२२ मध्ये टाटा समूहाने अधिकृतपणे एअर इंडियाचा ताबा घेतला. एअर इंडियाला अनेक दशके सरकारी मालकीखाली राहिल्यानंतर आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. त्यानंतर ही विमानसेवा टाटा समूहाच्या ताब्यात आली. परंतु, कामकाजाची पद्धत सरकारी मालकीचीच राहिल्याचे दिसत आहे. अलीकडच्या काळात, लोकांनी एअरलाइनमधील गैरव्यवस्थापनावर वारंवार प्रश्न उपस्थित केले आहेत.