Air India Flight Crash 11A Seat: गेल्या आठवड्यात, अहमदाबादमध्येएअर इंडियाचंविमान उड्डाणानंतर काही वेळातच क्रॅश झालं. त्यात असलेल्या २४२ प्रवाशांपैकी २४१ जणांचा मृत्यू झाला. विश्वासकुमार रमेश नावाचा फक्त एक प्रवासी बचावला. या विमानात '11A' क्रमांकाच्या सीटवर विश्वासकुमार बसले होते. ही सीट इमर्जन्सी एक्झिटजवळ होती. दरम्यान आता, या सीटची मागणी वाढली आहे. विमानातून प्रवास करणारे प्रवासी केवळ '11A' सीटची मागणी करत नाहीत तर असे अनेक आहेत ज्यांना इमर्जन्सी एक्झिटजवळ सीट हवी आहे.
खरंतर, सर्वच विमान कंपन्यांच्या विमानामध्ये आपत्कालीन एक्झिटजवळील सीटमध्ये इतर सीट्सच्या तुलनेत जास्त जागा असते. म्हणूनच त्या महाग असतात. तथापि, आपत्कालीन एक्झिटजवळील जागांची संख्या विमानाच्या प्रकार आणि वर्गानुसार बदलते. विमान वाहतूक तज्ज्ञांचं म्हणणं आहे की विमान अपघाताच्या बाबतीत आपत्कालीन एक्झिटजवळील जागा जास्त सुरक्षितता प्रदान करत नाहीत. त्या फक्त अधिक लेग स्पेस देतात. परंतु आता या जागांमुळे अनेक लोकांना मानसिक शांती मिळत असल्याचं दिसून येतंय.
ट्रेंड बदलला
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, पूर्वी बरेच प्रवासी इमर्जन्सी एक्झिटजवळ जागा घेत नव्हते. कारण त्यातील काही सीट्स जास्त झुकत नव्हत्या. याशिवाय, काही लोकांना आपत्कालीन परिस्थितीत एक्झिट दरवाजा कसा उघडायचा हे जाणून घ्यायचे नव्हतं. परंतु अहमदाबाद अपघातानंतर, हा ट्रेंड बदललेला दिसतोय. कोलकातामधील ट्रॅव्हल एजंट म्हणतात की अनुभवी प्रवासी आणि उंच लोक अनेकदा या जागांची निवड करायचे. ते त्यांचे पाय लांब करण्यासाठी जास्त पैसे देण्यास तयार होते. पण आता इतर लोकही या जागांबद्दल विचारू लागले आहेत.
अधिक पैसे देण्यासही तयार
जितेंद्र सिंग बग्गा यांचा डिस्ट्रिब्युशन आणि लॉजिस्टिक्सचा व्यवसाय आहे. त्यांनी त्यांच्या ट्रॅव्हल एजंटला पुढील आठवड्यात दिल्ली मार्गे अमेरिकेला जाताना त्यांच्यासाठी इमर्जन्सी एक्झिटजवळ एक सीट बुक करण्यास सांगितलं आहे. बग्गा म्हणाले, 'ही इमर्जन्सी एक्झिटजवळची सीट असली पाहिजे. त्यासाठी मी कोणतेही अतिरिक्त पैसे देण्यास तयार आहे. जर १७ जून रोजी ब्रिटिश एअरवेजच्या फ्लाइटमध्ये 11A सीट ही इमर्जन्सी एक्झिटजवळ असेल तर मला त्यावर बसायचं आहे.'
ली रोड येथील रहिवासी राजेश भगनानी हे वारंवार विमानानं प्रवास करतात. त्यांनी त्यांच्या ट्रॅव्हल एजंटला मुंबईला जाण्यासाठी इमर्जन्सी एक्झिटजवळईल सीट बुक करण्यास सांगितलं आहे. ते म्हणाले, 'विश्वसकुमार हे अपघातातून वाचल्यानंतर, मला आता इमर्जन्सी एक्झिटजवळ बसायचं आहे. कारण तिथे वाचण्याची शक्यता जास्त असेल. मला माहित आहे की जीवन आणि मृत्यू हा नशिबाचा विषय आहे. पण मी माझे सर्वोत्तम प्रयत्न करू इच्छितो. जर इमर्जन्सी एक्झिटजवळ सीट क्रमांक 11A असेल तर त्यापेक्षा चांगले काहीही नाही.'
11A ची मागणी वाढली
ट्रॅव्हल एजंट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय समिती सदस्य अनिल पंजाबी यांनी पुष्टी केली की इमर्जन्सी एक्झिटजवळील जागांबद्दल चौकशी वाढली आहे. ते म्हणाले की काही लोकांना 11A ही सीट जरी एक्झिटजवळ नसली तरी ती हवी आहे. ते म्हणाले की लोक आता या सीटबद्दल विचारत आहेत. ट्रॅव्हल एजंट्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या पूर्व विभागाच्या अध्यक्षा अंजनी धनुका म्हणाल्या की, इमर्जन्सी एक्झिटजवळील जागा तसेच 11A सीट्स शोधणाऱ्या प्रवाशांकडून त्यांना चौकशी येत आहे.