Air India CEO Salary : टाटा ग्रुपची विमान कंपनी एअर इंडियाचे विमान अहमदाबादहून लंडनला झेपावल्यानंतर काही मिनिटांतच अपघातग्रस्त झाले. यात २७० लोकांचा जीव गेला. या अपघाताची सध्या चौकशी सुरू असून रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. दरम्यान, या घटनेच्या एक दिवस आधी कंपनीच्या सीईओंच्या पगारात ४६ टक्के वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे हा विचित्र योगायोग मानला जात आहे. एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांना सध्या किती पगार मिळतो? चला जाणून घेऊया.
एअर इंडियाच्या सीईओंचा पगार किती वाढला?
अहवालानुसार, कॅम्पबेल विल्सन यांचा नवीन पगार २७.७५ कोटी रुपये निश्चित करण्यात आला आहे. २०२३-२४ मध्ये त्यांना मिळालेल्या १८.९८ कोटी रुपयांच्या पगारापेक्षा ही सुमारे ४६% जास्त वाढ आहे. विल्सन यांनी जुलै २०२२ मध्ये एअर इंडियाचे सीईओ म्हणून पदभार स्वीकारला होता, त्यावेळी त्यांचे वेतन २१.५० कोटी रुपये होते.
मिंटच्या अहवालानुसार, एअर इंडियाच्या सीईओचे हे नवीन पॅकेज १ एप्रिल २०२५ पासून लागू झाले आहे. या पॅकेजमध्ये ११.१ कोटी रुपये निश्चित वेतन, ८.३२ कोटी रुपये दीर्घकालीन स्टॉक प्रोत्साहन आणि ८.३२ कोटी रुपये कामगिरीवर आधारित बोनस यांचा समावेश आहे. एअर इंडिया बोर्डाने २७ मे २०२५ रोजी कॅम्पबेल विल्सन यांच्या या पगारवाढीला मंजुरी दिली होती.
कंपनीचे स्पष्टीकरण आणि विल्सनची कामगिरी
एअर इंडियाने या पगारवाढीवर स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, विल्सन यांचा पगार त्याच स्तरावरील बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये सीईओ किंवा एमडी असलेल्या परदेशी अधिकाऱ्यांइतकाच आहे. कंपनीने विल्सन यांनी आपल्या जबाबदाऱ्या खूप चांगल्या प्रकारे पार पाडल्याचे म्हटले आहे.
एअर इंडियाने नमूद केले आहे की, विल्सन यांनी केवळ एअरलाइनमध्येच परिवर्तन घडवले नाही, तर एअर इंडिया एक्सप्रेस आणि एआयएक्स कनेक्टचे विलीनीकरण करून एक किफायतशीर विमान कंपनी तयार केली. तसेच, विस्ताराचे एअर इंडियामध्ये विलीनीकरण करण्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
अपघातानंतर आव्हाने आणि पगाराचा कामगिरीशी संबंध
विल्सन यांच्या नवीन पगाराच्या ६०% रक्कम एअरलाइनच्या कामगिरीवर अवलंबून आहे. १२ जून २०२५ रोजी झालेल्या भयानक अपघातानंतर एअर इंडिया अनेक आव्हानांना तोंड देत आहे. या अपघातानंतर, अनेक विमानांमध्ये तांत्रिक बिघाड आढळून आला आणि त्यांना परत जावे लागले किंवा आपत्कालीन लँडिंग करावे लागले. अपघातानंतर, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही मार्गांवरील एअर इंडियाच्या बुकिंगमध्ये २०% घट झाली आहे आणि भाडेही ८-१५% कमी झाले आहे.
- या वाढीव पगारामुळे कॅम्पबेल विल्सन भारतातील सर्वाधिक पगार असलेल्या एअरलाइन सीईओंच्या यादीत समाविष्ट झाले आहेत. इतर एअरलाइन्सच्या सीईओंचे वेतन खालीलप्रमाणे आहे.
- इंडिगोचे सीईओ पीटर अल्बर्स यांना २०२४ मध्ये २१.६१ कोटी रुपये वेतन मिळते.
- आकासा एअरचे सीईओ विनय दुबे यांना ८.६५ कोटी रुपये वेतन मिळाले.
- स्पाइसजेटचे अध्यक्ष आणि एमडी अजय सिंग यांना ५.४ कोटी रुपये वेतन मिळाले.
या पगारवाढीचा निर्णय अपघाताच्या काही दिवस आधी झाल्याने आणि त्यानंतर कंपनीला आलेल्या आव्हानांमुळे याकडे सध्या मोठ्या गांभीर्याने पाहिले जात आहे.