गेल्या काही दिवसांपासून उद्योग क्षेत्रात कर्मचारी कपातीचे वारे वाहत आहेत. टीसीएस, मायक्रोसॉफ्टसारख्या आयटी सेक्टरमधील दिग्गज कंपन्यांनंतर आता ऑटोमोबाईल क्षेत्रामध्येही कामगार कपाचीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. इलेक्ट्रॉनिक वाहनांची वाढती संख्या, जागतिक मंदीचा दबाव आणि वाढती स्पर्धा या पार्श्वभूमीवर फ्रान्समधील दिग्गज कारनिर्माता कंपनी असलेल्या रेनॉल्ट(Renault) एसएने मोठ्या प्रमाणात कामगार कपात करण्याचे संकेत दिले आहेत. याबाबत मिळत असलेल्या माहितीनुसार ही कंपनी जगभरात मिळून ३ हजार कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे. याचा थेट परिणाम रेनॉल्टच्या एचआर, फायनान्स आणि मार्केटिंग डिपार्टमेंटमधील सपोर्ट सेवांवर होणार आहे.
रेनॉल्ट सपोर्ट सर्व्हिसमध्ये सुमारे १५ टक्के पदे कमी करण्याबाबत विचार करत आहे. मात्र कंपनीने याबाबत अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही. तसेच कपातीबाबत कुठलाही अंतिम निर्णय झालेला नाही, तसेच किती कर्मचाऱ्यांची कपात करायची याबाबतही काही ठरलेलं नाही, असे कंपनीने म्हटले आहे. आम्ही आमची कार्यप्रणाली अधिक सरळ करण्यावर, कामाचा वेग वाढवण्यावर भर देत आहोत. तसेच खर्च कमी करण्याचे पर्याय शोधत आहोत, असे कंपनीने सांगितले.
रेनॉल्टच्या वाहनां.ची अमेरिकेत विक्री होत नाही. त्यामुळे या कंपनीवर डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा भार पडलेला नाही. पण या कंपनीला अप्रत्यक्ष पद्धतीने झटला बसला आहे. अमेरिकन व्यापारामध्ये येत असलेल्या अडथळ्यांमुळे युरोपियन ऑटो कंपन्या रेनॉल्टचा अंतर्गत बाजार असलेल्या युरोपमध्ये आक्रमकपणे उतरत आहेत. त्यामुळे या कंपनीवर दबाव वाढला आहे.
त्याबरोबरच रेनॉल्टला चिनी ऑटो कंपन्यांकडूनही मोठ्या स्पर्धेचा सामना करावा लागत आहे. इलेक्ट्रिक आणि हायब्रिड कारच्या विश्वात चीनी कंपन्या वेगाने बाजार हस्तगत करत आहेत. त्यामुळे युरोपसारख्या स्थिर बाजारामध्ये रेनॉल्टची वाढ थांबली आहे. त्यामुळे कंपनी आता नव्या बाजारांवर लक्ष केंद्रित करत आहे. त्यासाठी कंपनी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत असून, आशिया आणि आफ्रिकेत आपली पकड भक्कम करण्याचा कंपनीचा मानस आहे.