Adani Group News: अदानी समूहाच्या पोर्टफोलिओमधून एका कंपनीला काढून टाकण्यात आलं आहे. अदानी समूहाने ब्लॉक डीलद्वारे AWL अॅग्री बिझनेस (पूर्वी अदानी विल्मर) मधील उर्वरित हिस्सा विकलाय. या बातमीचा परिणाम आज कंपनीच्या शेअर्सवर दिसून येत आहे, कंपनीचे शेअर्स ४ टक्क्यांनी घसरलेत.
अदानी समूहानं आपला उर्वरित ७ टक्के हिस्सा ब्लॉक डीलद्वारे विकला आहे. अदानी एंटरप्रायझेसची उपकंपनी असलेल्या अदानी कमोडिटी एलएलपीनं हा व्यवहार केला. अदानी समूहानं हा करार २७५.५० रुपये प्रति शेअर दरानं केला. या करारात जेफरीजवर इन्व्हेस्टमेंट बँकर्सची जबाबदारी देण्यात आली होती. एडब्ल्यूएल अॅग्री बिझनेस ही खाद्यतेल विक्री करणारी कंपनी आहे.
अनिल अंबानींच्या कंपन्यांच्या शेअर्सची बिकट स्थिती, ६०% पेक्षा अधिक आपटले; तुमच्याकडे आहेत का?
कंपनीचे शेअर्स आज घसरले
बीएसई वर एडब्ल्यूएल अॅग्री बिझिनेस लिमिटेडचे शेअर्स २८०.०५ रुपयांवर उघडले. परंतु काही वेळातच शेअर्स ४ टक्क्यांनी घसरून २६६.४५ रुपयांच्या इंट्रा-डे नीचांकी पातळीवर आले. बीएसईवर कंपनीचा इंट्रा-डे हाय २८२.९० रुपये होता. कंपनीचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ३३७ रुपये आणि ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर २३१.५५ रुपये आहे. या कंपनीचं मार्केट कॅप ३५१७५.८० कोटी रुपये आहे.
एडब्ल्यूएल अॅग्री बिझिनेस लिमिटेडचे शेअर्स शेअर बाजारात संघर्ष करीत आहेत. गेल्या ६ महिन्यांत कंपनीच्या शेअरच्या किंमतीत ४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. या काळात सेन्सेक्स निर्देशांकात ४.५३ टक्क्यांची वाढ झाली आहे. एका वर्षात एडब्ल्यूएल अॅग्री बिझनेस लिमिटेडच्या शेअर्सच्या किंमती ८.१० टक्क्यांनी घसरल्या आहेत. ३ वर्षांत या खाद्यतेल कंपनीचा शेअर ५६ टक्क्यांनी घसरलाय.
कंपनीची आर्थिक परिस्थिती काय आहे?
सप्टेंबर तिमाहीत एडब्ल्यूएल अॅग्री बिझिनेस लिमिटेडचा निव्वळ नफा २४४.८५ कोटी रुपये होता. जे वार्षिक आधारावर २१ टक्क्यांनी घसरले. गेल्या वर्षी याच कालावधीत कंपनीला ३११.०२ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता.
