Adani Group Acquisitions 2025 : वर्ष २०२५ संपायला आले असून, सर्वजण नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी करत आहेत. अनेक मोठ्या व्यावसायिक समूहांसाठी हे वर्ष यशाचे ठरले, त्यापैकीच एक म्हणजे गौतम अदानी यांचा 'अदाणी समूह'. अदानी समूहाने या वर्षात अर्धा डझनहून अधिक कंपन्यांचे अधिग्रहण केले. यात अनेक मोठ्या आणि महत्त्वाच्या कंपन्यांचा समावेश आहे.
या वर्षी अदानी समूहाने विविध क्षेत्रांतील अनेक कंपन्या विकत घेतल्या आहेत, ज्यामुळे समूहाची ताकद आणि बाजारातील पकड अधिक मजबूत झाली आहे. कर्जात बुडालेल्या *पी असोसिएट्सच्या अधिग्रहणाचे काम सध्या प्रक्रियेत असले तरी, त्याची बोली अदानींनीच जिंकली आहे.
अदानी समूहाने २०२५ मध्ये केलेले प्रमुख अधिग्रहण
अदानी समूहाने २०२५ या वर्षात ज्या प्रमुख कंपन्या ताब्यात घेतल्या आहेत, त्या खालीलप्रमाणे आहेत. यापैकी अनेक अधिग्रहणांची प्रक्रिया अजूनही सुरू आहे.
- जयप्रकाश असोसिएट्स लिमिटेड
- केपीएस III एचव्हीडीसी ट्रान्समिशन लिमिटेड
- फ्लाइट सिमुलेशन टेक्निक सेंटर
- ट्रेड कॅसल टेक पार्क प्रायव्हेट लिमिटेड
- विदर्भ इंडस्ट्रीज पॉवर लिमिटेड
- आयटीडी सिमेंटेशन
महत्त्वाच्या अधिग्रहणांचा तपशील
कर्जात बुडालेल्या जयप्रकाश असोसिएट्स लिमिटेडला दिवाळखोरी प्रक्रियेअंतर्गत खरेदी करण्यासाठी अदानी समूहाने बोली जिंकली आहे. नोव्हेंबर २०२५ मध्ये कर्जदात्यांनी अदानींच्या १४,५३५ कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. यामध्ये सिमेंट, रिअल इस्टेट आणि हॉस्पिटॅलिटीसारख्या अनेक मालमत्तांचा समावेश आहे. नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलकडून अंतिम मंजुरी मिळणे अजून बाकी आहे.
पॉवर सेक्टरमध्ये १००% भागीदारी
अदानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेडने पीएफसी कन्सल्टिंगकडून केपीएस III एचव्हीडीसी ट्रान्समिशन लिमिटेडमध्ये १००% हिस्सा विकत घेतला. या अधिग्रहणामुळे AESL ला आपल्या भागधारकांसाठी मूल्य वाढवण्याच्या धोरणाला आणखी गती मिळाली आहे.
एव्हिएशन क्षेत्रात प्रवेश
अदानी डिफेन्स सिस्टिम्स अँड टेक्नॉलॉजीज लिमिटेडने फ्लाईट सिम्युलेशन टेक्निक सेंटर प्रायव्हेट लिमिटेड (FSTC) मध्ये मोठी हिस्सेदारी खरेदी करण्याचा करार अंतिम केला आहे. FSTC ही भारतातील सर्वात मोठी स्वतंत्र फ्लाईट ट्रेनिंग आणि सिम्युलेशन पुरवणारी कंपनी आहे. या कराराचे मूल्य ८२० कोटी रुपये (एंटरप्राइज व्हॅल्यू) आहे.
डेटा सेंटरसाठी मोठी खरेदी
अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडने त्यांच्या 'अदानीकॉनएक्स' या जॉईंट व्हेंचरद्वारे ट्रेड कॅसल टेक पार्क प्रायव्हेट लिमिटेडचे २३१.३४ कोटी रुपयांमध्ये अधिग्रहण केले. एसीएक्सच्या डेटा सेंटर पायाभूत सुविधांच्या विकासाला मजबूत करण्यासाठी ही खरेदी महत्त्वाची आहे.
अदानी पॉवरची क्षमता वाढली
अदानी पॉवरने जुलै २०२५ मध्ये ४,००० कोटी रुपयांमध्ये विदर्भ इंडस्ट्रीज पॉवर लिमिटेडचे अधिग्रहण पूर्ण केले. यामुळे त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये महाराष्ट्रातील बुटीबोरी येथील २x३०० मेगावॅटचा कोळसा आधारित पॉवर प्लांट जोडला गेला आहे. या अधिग्रहणानंतर अदानींच्या वीज निर्मिती क्षमतेत लक्षणीय वाढ झाली आहे.
वाचा - सोने-चांदी पुन्हा महागले! खरेदी करण्यापूर्वी २२ कॅरेट आणि २४ कॅरेटचे दर पाहा; आणखी भाव वाढणार?
आयटीडी सिमेंटेशनमध्ये नियंत्रक हिस्सा
अदानी समूहाने त्यांच्या रिन्यू एक्सिम डीएमसीसी कंपनीमार्फत आयटीडी सिमेंटेशन इंडिया लिमिटेडमध्ये सुमारे ५,७५७ कोटी रुपयांमध्ये नियंत्रक हिस्सा विकत घेतला. सीसीआयच्या मंजुरीनंतर २०२५ च्या सुरुवातीला हा करार अंतिम करण्यात आला. सप्टेंबर २०२५ मध्ये आयटीडी सिमेंटेशनचे नाव बदलून सेमइंडिया प्रोजेक्ट्स लिमिटेड असे करण्यात आले आहे.
