Gautam Adani News: देशातील तिसऱ्या क्रमांकाच्या मोठ्या औद्योगिक घराण्यातील अदानी समूहाची फ्लॅगशिप कंपनी अदानी एंटरप्रायझेसचा (Adani Enterprises) २५,००० कोटी रुपयांचा राइट्स ऑफर २५ नोव्हेंबर रोजी उघडेल आणि १० डिसेंबर रोजी बंद होईल. कंपनीनं यासंदर्भातील माहिती दिली आहे.
कंपनीच्या बोर्डाने ११ नोव्हेंबर रोजी या राइट्स ऑफरला मंजुरी दिली होती. यासाठी शेअरची किंमत १,८०० रुपये प्रति शेअर ठेवण्यात आली आहे, जी त्या दिवशीच्या शेअरच्या बंद भावापेक्षा २५% कमी आहे. शुक्रवारी कंपनीचा शेअर १.२९ टक्के तेजीसह ₹२,५१६.८५ वर बंद झाला.
तीन हप्त्यांमध्ये रक्कम भरावी लागेल
कंपनीनं हे देखील स्पष्ट केलंय, भागधारकांना संपूर्ण रक्कम म्हणजेच प्रत्येक शेअरसाठी १,८०० रुपये एकाच वेळी द्यावे लागणार नाहीत. ते ही रक्कम तीन हप्त्यांमध्ये भरू शकतील. अर्ज करताना भागधारकांना ९०० रुपये द्यावे लागतील. यानंतर आणखी दोन हप्ते असतील, ज्यांना बाजाराच्या भाषेत 'फर्स्ट कॉल' आणि 'सेकंड कॉल' म्हटलं जातं. या दोन्ही हप्त्यांमध्ये त्यांना ४५०-४५० रुपये द्यावे लागतील. पहिल्या कॉलची मुदत १२ जानेवारी ते २७ जानेवारी २०२६ पर्यंत असण्याची अपेक्षा आहे.
राइट्स इश्यू काय आहे?
अदानी एंटरप्रायझेसची आर्थिक वर्ष २०२६ मध्ये ३६,००० कोटी रुपये कॅपेक्स करण्याची योजना आहे. यापैकी १६,३०० कोटी रुपये पहिल्या सहामाहीत खर्च केले गेले आहेत. या ३६,००० कोटी रुपयांपैकी खालीलप्रमाणे खर्च केला जाईल:
- १०,५०० कोटी रुपये एअरपोर्ट व्यवसायावर
- ६,००० कोटी रुपये रोड प्रकल्पांवर
- ९,००० कोटी रुपये पेट्रोकेमिकल्स आणि मटेरियल्सवर
- ३,५०० कोटी रुपये मेटल्स आणि मायनिंगवर
- ५,५०० कोटी रुपये अदानी न्यू इंडस्ट्रीजवर खर्च होतील.
राइट्स इश्यू ही एक अशी प्रक्रिया आहे, ज्यामध्ये कोणतीही कंपनी तिच्या सध्याच्या भागधारकांना सवलतीच्या किमतीत अतिरिक्त शेअर्स खरेदी करण्याचा अधिकार देते. कंपन्या यातून जमा होणाऱ्या रकमेचा वापर त्यांचा व्यवसाय विस्तारण्यासाठी, कर्ज फेडण्यासाठी किंवा इतर उद्दिष्टांसाठी करतात.
