Stock Market Small Investor: भारतीय शेअर बाजारातील स्मॉलकॅप शेअर्समध्ये किरकोळ गुंतवणूकदारांनी गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर पैसा गुंतवला आहे. या विभागानं गुंतवणूकदारांना उत्तम नफाही दिला. मात्र, आता हे क्षेत्र धोक्यात आले असून बीएसई स्मॉलकॅप २५० इंडेक्स डिसेंबर २०११ नंतरच्या आपल्या सर्वात वाईट टप्प्यातून जात आहे. अशा स्थितीत गुंतवणूकदारांसमोर प्रश्न पडलाय, या पडत्या बाजारात शेअर्स खरेदी करावेत की आपली उरलेली रक्कम वाचवून बाहेर पडावं?
स्मॉलकॅप निर्देशांकाची सद्यस्थिती
बीएसई स्मॉलकॅप २५० इंडेक्स सलग तिसऱ्या तिमाहीत रेड झोनमध्ये बंद होण्याच्या मार्गावर आहे. गेल्या तीन तिमाहींमध्ये हा निर्देशांक सुमारे १६.८ टक्क्यांनी घसरला असून, चालू तिमाहीतच यात १२ टक्क्यांची घसरण झाली आहे. जून २०२२ नंतरची ही सर्वात मोठी घसरण मानली जात आहे. महागाई, उच्च व्याजदर आणि जागतिक अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदार स्मॉलकॅप शेअर्सपासून दूर जात आहेत. सध्या या निर्देशांकाचा पी/ई (P/E) रेशो २४.६२x आहे, जो त्याच्या दीर्घकालीन सरासरी २७.३x पेक्षा कमी आहे.
बाजारातील घसरणीची प्रमुख कारणे
२०२५ च्या सुरुवातीपासूनच भारतीय बाजारावर दबाव दिसून येत आहे, ज्यामागे खालील प्रमुख कारणे आहेत:
परदेशी गुंतवणूकदारांची माघार: परदेशी संस्थागत गुंतवणूकदार सातत्यानं भारतीय बाजारातून पैसा काढून घेत आहेत.
कमकुवत कॉर्पोरेट अर्निंग: कंपन्यांच्या तिमाही निकालांनी निराशा केली आहे, विशेषतः आयटी क्षेत्रात एआय (AI) मुळे भविष्यातील वाढीबाबत संशय निर्माण झालाय.
भू-राजकीय तणाव: अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील वाढत्या संघर्षामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे.
कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती: मध्य-पूर्वेतील तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमती कमी होत नसल्यानं भारतावरील दबाव वाढला आहे.
सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये ११.५ टक्क्यांची घसरण
चालू तिमाहीत सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्हीमध्ये ११.५ टक्क्यांची घसरण झाली आहे, जी मार्च २०२० नंतरची सर्वात मोठी तिमाही घसरण आहे. बीएसई मिडकॅप १५० इंडेक्स देखील ९ टक्क्यांनी घसरला आहे. जागतिक ब्रोकरेज हाऊसेसनंही भारतीय बाजाराचं रेटिंग कमी केले आहे. सिटी (Citi) नं २०२६ च्या अखेरपर्यंतचे निफ्टी ५० चं टार्गेट कमी केलं असून ऑटो शेअर्सचं रेटिंग ‘न्यूट्रल’ केले आहे. नोमूरानं (Nomura) निफ्टीचं टार्गेट १५ टक्क्यांनी कमी करून २४,९०० केले आहे, तर यूबीएस (UBS) ग्लोबल वेल्थ मॅनेजमेंटनेही भारतीय शेअर्सचं रेटिंग ‘न्यूट्रल’ केलंय.
सुधारणांची शक्यता काय?
काही बाजार तज्ज्ञांना स्मॉलकॅप शेअर्समध्ये सुधारणेची शक्यता वाटत आहे. मार्केट एक्सपर्ट सुशील केडिया यांच्या मते, बाजार स्थिर झाल्यानंतर पुढील सहा महिन्यांत स्मॉलकॅप शेअर्स लार्जकॅपच्या तुलनेत ३५-४० टक्के चांगली कामगिरी करू शकतात. त्यांनी असंही नमूद केले की, मजबूतीचे सुरुवातीचे संकेत दिसत असून जर निफ्टी २७,००० च्या पातळीच्या जवळ पोहोचला, तर मोठी तेजी येण्याची शक्यता आहे.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
