LIC Huge Loss: केंद्र सरकारने सिगरेटवर एक्साईज ड्युटी (Excise Duty) लावण्याची घोषणा केली आहे, जी फेब्रुवारी २०२६ पासून लागू होईल. हे शुल्क सिगरेट आणि तंबाखू उत्पादनांवर लागलेल्या ४०% जीएसटीच्या व्यतिरिक्त असेल. सरकारच्या या निर्णयानंतर सिगरेट बनवणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. गॉडफ्रे फिलिप्स आणि आयटीसी लिमिटेडचे (ITC Ltd) शेअर्स दोन दिवसांत २० टक्क्यांहून अधिक पडले आहेत.
गुरुवारी आयटीसी लिमिटेडच्या शेअर्समध्ये १० टक्क्यांची घसरण झाली होती आणि शुक्रवारी हा शेअर ४ टक्क्यांनी तुटून ३50 रुपयांवर आला. या मोठ्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे प्रचंड नुकसान झालंय. आयटीसी लिमिटेडमध्ये एलआयसीचीही (LIC) मोठी गुंतवणूक आहे, ज्यामुळे गेल्या दोन दिवसांत त्यांना मोठा फटका बसलाय.
एलआयसीचे ११,००० कोटी रुपये बुडाले
भारतीय आयुर्विमा महामंडळाची (LIC) ३० सप्टेंबरपर्यंत आयटीसी लिमिटेडमध्ये १५.८६ टक्के भागीदारी होती, जी दुसरी सर्वात मोठी स्टेकहोल्डर आहे. या हिशोबानं पाहिल्यास, २ दिवसांच्या दरम्यान एलआयसीच्या संपत्तीत मोठी घट झाली असून ती अंदाजे ११,००० कोटी रुपये आहे.
बुधवारी आयटीसीमधील एलआयसीच्या हिस्स्याची किंमत ८०,०७९.८४ कोटी रुपयांवरून कमी होऊन ६९,४९८.५७ कोटी रुपये राहिली, म्हणजेच दोन दिवसांत १०,५८१ कोटी रुपयांची घसरण झाली. एलआयसीनं किमान २०१७ पासून आयटीसीमधील आपली भागीदारी १५-१६ टक्के या मर्यादेत ठेवली आहे.
आयटीसीचं मार्केट कॅपिटलायझेशनदेखील कमी होऊन ४,५५,९९१ कोटी रुपये झालं आहे. या शेअरने शुक्रवारी आपला नीचांकी स्तरही गाठला होता, जो ३४५.२५ रुपये प्रति शेअर आहे. आयटीसीच्या शेअर्सची ५२ आठवड्यांची उच्चांकी पातळी ४७१.५० रुपये प्रति शेअर आहे.
कोणा कोणाकडे आहेत आयटीसीचे शेअर्स?
Tobacco Manufacturers (India) कडे आयटीसीमध्ये १७.७९ टक्के भागीदारी असून ती या एफएमसीजी कंपनीतील सर्वात मोठी भागधारक आहे. इतर प्रमुख भागधारकांमध्ये एसबीआय म्युच्युअल फंड ३.२६ टक्के, आयसीआयसीआय प्रुडेंशियल म्युच्युअल फंड २.२८ टक्के, जीक्यूजी पार्टनर्स इमर्जिंग मार्केट्स इक्विटी फंड २.१० टक्के आणि जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया १.७३ टक्के यांचा समावेश आहे.
एमके ग्लोबलनं म्हटलंय की, जर हे दर लागू झाले तर ते आयटीसीसाठी नकारात्मक असेल. यामुळे कंपनीचं उत्पन्न प्रभावित होऊ शकतं, उत्पादनात घट होऊ शकते आणि प्रोडक्ट मिक्समध्ये घसरण येऊ शकते. ब्रोकरेजनं आयटीसीचे रेटिंग 'ॲड' वरून कमी करून 'रिड्यूस' केलं आहे. कर वाढीचा प्रभाव लक्षात घेता उत्पन्नाच्या अंदाजात कपात केल्यानंतर, ब्रोकरेज फर्मनं डिसेंबर २०२६ साठी ३५० रुपयांचे 'टार्गेट प्राईस' दिलं आहे, तर सप्टेंबर २०२६ पर्यंत ४७५ रुपयांचा अंदाज दिला होता.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
