भारतासह संपूर्ण आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आता 100 बिलियन डॉलर अर्थात 8,00,00,00,000,000 रुपयांच्या क्लब मधून बाहेर पडले आहेत. ब्लूमबर्ग बिलेनियर्स इंडेक्समद्ये यासंदर्भात खुलासा करण्यात आला आहे. मुकेश अंबानी यांची संपत्ती आता 99.6 बिलियन डॉलर एवढी आहे.
आपल्याला जाणून आश्चर्य वाटेल की, रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांची संपत्ती यावर्षात तब्बल 8.12 बिलियन डॉलरने अर्थात साधारणपणे 7.32 लाख कोटी रुपयांनी कमी झाली आहे. यामुळे रिलायन्सच्या शेअर्समध्येही घसरण बघायला मिळाली आहे.
लूजर्सच्या यादीत पहिल्या क्रमांकावर कोण? -
एकूण संपत्ती घटण्याच्या बाबतीत मुकेश अंबानी हे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे लूजर आहेत. आणि त्यांच्या पुढे केवळ मेटा प्लॅटफॉर्म्सचे CEO मार्क झुकरबर्ग आहेत. त्यांच्या संपत्तीत 9.84 बिलियन डॉलर एवढी घट झाली आहे. यामुळे त्यांची एकूण संपत्ती 223 बिलियन डॉलरवर आली आहे. ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत सहाव्या क्रमांकावर आले आहेत.
ब्लूमबर्गच्या अहवालात जगातील सर्वात श्रीमंत -व्यक्तींच्या यादीत पहिल्या क्रमांकावर इलॉन मस्क आहेत. या वर्षात त्यांची संपत्ती तब्बल 20.9 बिलियन डॉलरने वाढली आहे. आता त्यांची एकूण संपत्ती 640 बिलियन डॉलर एवढी आहे. तसेच भारतीय उद्योजक गौतम अदानी यांची एकूण संपत्ती 81 बिलियन डॉलर एवढी आहे. ते 21व्या क्रमांकावर आहेत.
Q3 च्या निकालांवर सर्वांचे लक्ष -
कंपनीचे शेअर्स आणि चेअरमनच्या निव्वळ संपत्तीत घट झाल्याने, गुंतवणूकदारांचे लक्ष आता तिमाही निकालांकडे लागले आहे. तेल आणि दूरसंचार क्षेत्रात काम करणारी ही कंपनी शुक्रवार, 16 जानेवारी रोजी ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर करणार आहे. कंपनीच्या महसुलात गेल्या तिमाहीच्या तुलनेत 1 टक्क्याने वाढ होण्याची शक्यत आहे.
