Success Story: बारावीत नापास असणाऱ्या एका तरुणाने आपल्या मेहनतीने आणि समर्पणाने यशाचा नवा इतिहास लिहिला आहे. माध्यमिक शाळेतच गाडी अडकल्यानंतर नातेवाईकांनी भरपूर टीका केली. तुला आता कुणाच्यातरी हाताखाली आयुष्यभर काम करावे लागेल, असा सल्लाही दिला. मात्र, पठ्ठ्याने हार मानली नाही. कुठेतरी नोकरी करण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय त्याने घेतला. आज त्याच तरुणाने कोट्यवधी रुपयांची कंपनी उभारली आहे. एवढेच काय त्याने फक्त ७ दिवसात ३३६ कोटी रुपये कमावले आहेत.
अमेरिकेतील गिरीश माथरुबूथमच्या यशाची ही गोष्ट आहे. गिरीश बारावीच्या परीक्षेत नापास झाल्यानंतर नातेवाईक आणि मित्रांनी त्याची खिल्ली उडवली. तू आता रिक्षावाला होणार अशी मस्करी केली. सर्व टीका सहन करुन त्याने पुन्हा जोमाने अभ्यास सुरू केला. शेवटी HCL मध्ये नोकरी मिळवण्यात यश मिळवले. नंतर तो झोहो या सॉफ्टवेअर कंपनीत लीड इंजिनीअर म्हणून काम करू लागला.
५३,००० कोटींची कंपनी
गिरीश माथरुबूथम यांच्या कंपनीचे नाव 'फ्रेशवर्क्स' आहे, जी आयटी सोल्यूशन्स सेवा देते. आज या कंपनीचे मूल्यांकन ५३००० कोटी रुपये आहे. गिरीशने २०१० मध्ये फ्रेशवर्क्स सुरू केले, जेव्हा त्याने जोहो येथील नोकरी सोडली होती. २०१८ पर्यंत, कंपनीचे १२५ देशांमध्ये १००,००० पेक्षा जास्त ग्राहक होते. गिरीश यांच्याकडे सध्या फ्रेशवर्क्समध्ये ५.२२९ टक्के हिस्सा आहे, त्यांची एकूण मालमत्ता सुमारे २,३६९ कोटी रुपये आहे.
७ दिवसात ३४० कोटींची कमाई
गेल्या आठवड्यात गिरीश यांनी फ्रेशवर्क्सचे शेअर्स विकले. त्यांनी ७ दिवसात एकूण ३९.६ मिलियन डॉलर्सचे शेअर्स विकले. जे अंदाजे ३३६.४१ कोटी रुपयांच्या समतुल्य आहे. त्यानुसार त्यांनी एका आठवड्यात ३३६ कोटींहून अधिक कमाई केली आहे. यासह, गिरीशने फ्रेशवर्क्ससह सास (सॉफ्टवेअर सेवा) व्यवसायात प्रवेश केला, जे सास उद्योगातील एक आघाडीचे नाव बनले आहे.
सास व्यवसाय म्हणजे काय?
SaaS बद्दल सांगायचं झालं तर या कंपन्या त्यांच्या ग्राहकांना ऑनलाइन सॉफ्टवेअर सोल्यूशन्स देतात. सॉफ्टवेअर खरेदी आणि इन्स्टॉल करण्याऐवजी ग्राहक हे उपाय वापरण्यासाठी सदस्यता घेतात. यातून अनेक प्रकारच्या सुविधा मिळतात, ज्यामुळे त्यांना त्यांचा व्यवसाय वाढवणे सोपे जाते.