नवी दिल्ली : वर्षभरात रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात अडीच टक्क्यांनी वाढ केल्याने कर्जावरील व्याजदरही वाढले, तरीदेखील देशभरात कर्जाच्या मागणीतही मोठी वाढ झाल्याचे इक्विफॅक्स आणि एन्ड्रोमेडाच्या ‘इंडियन रिटेल लोन ओवरव्ह्यू’ या अहवालातून समोर आले. २०२२ मध्ये देशभरात सुमारे १०० लाख कोटींचे किरकोळ कर्ज वितरित करण्यात आले. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडून सर्वाधिक ३३% कर्जवितरित करण्यात आले.
कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर देशाच्या अर्थव्यवस्थेने मोकळा श्वास घेतला आहे. परिणामी, नागरिकांकडून गृह तसेच वैयक्तिक कर्जासह अन्य कर्जांच्या मागणी वाढली आहे. शिवाय ग्राहकोपयोगी वस्तू आणि सोने तारण कर्जाचे प्रमाणही वाढले आहे. देशभरातील एकूण कर्जवितरण व्यवसायात तेलंगणात २९% वाढ झाली आहे.
महाराष्ट्र का महत्त्वाचा?
महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात, तेलंगणा या राज्यांमध्ये सर्वाधिक कर्ज वितरण होत असून, औद्योगिक कर्ज देण्यात या राज्यांचा वाटा तब्बल ५५ टक्के इतका आहे.
गृहकर्जाची प्रकरणे नऊ लाख कोटींवर
- मागील आर्थिक वर्षात ३४ लाख ग्राहकांना गृह कर्ज वितरित करण्यात आले. या कर्जांची एकूण किंमत नऊ लाख कोटी इतकी आहे.
- बहुतांश कर्ज हे २५ लाखांपर्यंतचे असून गृहकर्ज वितरित करण्याचे प्रमाण १८ टक्क्यांनी वाढले आहे. मागील वर्षांच्या तुलनेत या टप्प्यातील कर्जाची मागणी ६७ टक्क्यांनी वाढली आहे.
- २० डिसेंबर २०२० ते डिसेंबर २१ दरम्यान २६ ते ३० वर्षे वयोगटातील तरुणांना कर्ज देण्यात ३८ टक्क्यांची मोठी वाढ झाली आहे.
- ० ते २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज सर्वाधिक दिले जाते.
- ७५ ते एक कोटी रुपये रकमेचे कर्ज देण्याचे प्रमाण ३६ टक्क्यांनी वाढले आहे.
- ३४ लाख गृह कर्जे (नऊ लाख कोटी रुपयांची) जानेवारी २२ ते डिसेंबर २०२२ दरम्यान देण्यात आली.
१७% वाढ उद्योजकांच्या कर्जामध्ये झाली आहे.