Mutual Funds Schem : आजकाल प्रत्येकजण आपले पैसे वाढवण्यासाठी नवनवीन मार्ग शोधत आहे. यात म्युच्युअल फंड्सचे नाव आघाडीवर आहे. मात्र, म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक सुरू करताना अनेकजण एसआयपी, एसडब्लूपी आणि एसटीपी या तीन प्रमुख साधनांमध्ये अनेकांचा गोंधळ होतो. जर तुम्हालाही हे तिन्ही प्लॅन्स काय आहेत, त्यांच्यात नेमका फरक काय आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला सर्वात जास्त फायदा कशातून मिळेल, हे जाणून घ्यायचे असेल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे.
१. SIP (सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन) : शिस्तबद्ध बचत
एसआयपी म्हणजे सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. हा असा मार्ग आहे जिथे तुम्ही दर महिन्याला किंवा एका निश्चित तारखेला लहान रक्कम म्युच्युअल फंडात गुंतवतात. यामध्ये रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंगचा फायदा मिळतो. बाजार वाढलेला असो वा खाली आलेला, तुमच्या गुंतवणुकीवर फारसा परिणाम होत नाही, कारण तुमचे युनिट्स कमी-जास्त भावाने खरेदी केले जातात. जे लोक शिस्तीने बचत करू इच्छितात, त्यांच्यासाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे. मुलांचे शिक्षण किंवा निवृत्तीसारख्या भविष्यातील मोठ्या आर्थिक उद्दिष्टांसाठी एसआयपी एकदम परफेक्ट आहे. लहान रकमेतून चक्रवाढ व्याजाच्या मदतीने मोठा निधी तयार होतो.
२. SWP (सिस्टिमॅटिक विथड्रॉवल प्लॅन) : पेन्शनसारखे नियमित उत्पन्न
एसडब्ल्यूपी म्हणजे सिस्टिमॅटिक विथड्रॉवल प्लॅन. हा एसआयपीच्या अगदी उलट मानला जातो. येथे तुम्ही फंडातून दर महिन्याला एक निश्चित रक्कम काढता. निवृत्त झालेल्या लोकांसाठी किंवा ज्यांना नियमित उत्पन्नाची गरज आहे, त्यांच्यासाठी हे पेन्शनसारखे काम करते. तुमची मूळ रक्कम फंडात गुंतलेली राहते, ती वाढतही राहते आणि तुमच्या गरजेनुसार पैसे बाहेर येत राहतात. निवृत्तीनंतर किंवा एखाद्या आणीबाणीच्या उत्पन्नासाठी हा उत्तम पर्याय आहे. यात स्मार्ट पद्धतीने पैसे काढले जात असल्याने टॅक्सही कमी लागू शकतो.
३. STP (सिस्टिमॅटिक ट्रान्सफर प्लॅन) : सुरक्षित गुंतवणुकीची रणनीती
एस-टी-पी म्हणजे सिस्टिमॅटिक ट्रान्सफर प्लॅन. हा एसआयपी आणि एसडब्ल्यूपीच्या मधला मार्ग आहे. तुमच्याकडे बोनस किंवा इतर मोठी रक्कम एकरकमी जमा असेल, तर ती आधी एका सुरक्षित डेट फंडात 'जमा' केली जाते. त्यानंतर दर महिन्याला थोडी थोडी रक्कम त्या डेट फंडातून काढून इक्विटी फंडात ट्रान्सफर केली जाते. बाजारातील जोखीम कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी ही स्मार्ट स्ट्रॅटेजी आहे. एकरकमी गुंतवणूक केल्यास सारा पैसा एकाच वेळी खाली जाण्याची भीती कमी होते. बाजार घसरलेला असल्यास स्वस्त युनिट्स खरेदी करता येतात.
तुमची निवड कशावर आधारित असावी?
| योजना | उद्देश | कोणासाठी सर्वोत्तम |
| एसआयपी | भविष्यासाठी मोठा निधी तयार करणे. | तरुण गुंतवणूकदार, लहान रकमेपासून सुरुवात करणारे. |
| एसडब्लूपी | गुंतवणुकीतून नियमित उत्पन्न मिळवणे. | निवृत्त लोक, पेन्शन हवे असणारे. |
| एसटीपी | जोखीम कमी करून मोठी एकरकमी रक्कम बाजारात सुरक्षितपणे गुंतवणे. | बोनस किंवा मोठी रक्कम मिळालेले गुंतवणूकदार. |
हे तिन्ही प्लॅन दीर्घकाळात फायदा देऊ शकतात. तुमच्या सध्याच्या आर्थिक गरजा ओळखून तुम्ही योग्य साधनाचा वापर करू शकता.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
