Investment Tips : जर श्रीमंत व्हायचं असेल तर आयुष्यात लवकर गुंतवणूक सुरू करण्याचा सल्ला दिला जातो. पण सध्याच्या काळात अनेकांना २५ ते ३० वर्षांपर्यंत निवृत्तीचे नियोजन करणे शक्य होत नाही. मात्र, चांगली गोष्ट अशी आहे की, आजची तरुण पिढी निवृत्तीनंतरच्या नियमित उत्पन्नाबाबत आणि पेन्शनबाबत अधिक सतर्क झाली आहे. तुम्ही ३०, ४० किंवा अगदी ५० वर्षांचे असलात तरीही योग्य गुंतवणूक धोरण अवलंबून कोट्यवधींचा निवृत्ती निधी जमा करू शकता.
वय वर्ष ३० : 'वेळ' हीच तुमची सर्वात मोठी ताकद!
३० व्या वर्षी बचत सुरू करणे हा सर्वात चांगला काळ आहे. या वयात तुमच्याकडे 'वेळ' ही सर्वात मोठी ताकद आहे, ज्यामुळे चक्रवाढ व्याजाचा जास्तीत जास्त फायदा होतो. या वयात जास्तीत जास्त धोका पत्करुन आक्रमक आणि इक्विटी-केंद्रित गुंतवणूक करता येते. इक्विटी म्युच्युअल फंड्समध्ये एसआयपी सुरू करा. यात सरासरी १२% पर्यंत परतावा मिळू शकतो. कर बचत आणि दीर्घकालीन पेन्शनसाठी एनपीएस बेस्ट आहे. गुंतवणुकीसोबत आरोग्य आणि जीवन विमा घ्यायला विसरू नका. जितक्या लवकर सुरुवात कराल, तितकी निवृत्तीसाठी कमी मेहनत करावी लागेल आणि मोठा फंड तयार होईल.
चाळीशी : 'संतुलित' दृष्टिकोन आवश्यक!
चाळीशीत पोहोचल्यावर कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतात (उदा. मुलांचे शिक्षण, घराचे कर्ज) आणि आरोग्याच्या चिंताही वाढू लागतात. त्यामुळे या टप्प्यावर संतुलित गुंतवणूक ठेवणे आवश्यक आहे. इक्विटीमध्ये गुंतवणूक सुरू ठेवून जोखीम थोडी कमी करा. ४० व्या वर्षी तुमची कमाई वाढलेली असते, त्यामुळे एसआयपीची रक्कम वाढवा. ईपीएफ आणि एनपीएसमध्ये जास्तीत जास्त योगदान देऊन कर बचतीचा फायदा घ्या. जास्त जोखीम न घेता इक्विटी आणि डेटचे मिश्रण असलेल्या बॅलन्स्ड फंड्सचा पर्याय निवडू शकता. वाढत्या जबाबदाऱ्यांमुळे गुंतवणुकीत खंड पडणार नाही याची दक्षता घ्या.
वयाची ५० वर्षे : सुरक्षित आणि स्थिर परताव्यावर लक्ष केंद्रित करा!
जर तुम्ही ६० व्या वर्षी निवृत्त होत असाल, तर पन्नाशीत मोठा निधी जमा करणे हे एक मोठं आव्हान असते. या वयात जोखीम घेण्याची क्षमता कमी होते. अशावेळी संरक्षणात्मक आणि स्थिर परतावा देणाऱ्या पर्यायांवर जास्त लक्ष केंद्रित करा. इक्विटीमधील गुंतवणुकीचा काही भाग हळूहळू डेट फंड्स किंवा बाँड्समध्ये ट्रान्सफर करा. पीपीएफ आणि एफडीमध्ये गुंतवणूक वाढवा, जे सुरक्षित आणि निश्चित परतावा देतात. निवृत्तीच्या वेळी पेन्शन देण्यासाठी एनपीएसची अॅन्युइटी योजना फायद्याची ठरते. लक्षात ठेवा महागाईवर मात करण्यासाठी पोर्टफोलिओतून इक्विटी पूर्णपणे काढून टाकू नका, पण मोठी जोखीम घेणे टाळा.
वाचा - 'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
