Mutual Funds Tips : गेल्या दीड महिन्यापासून भारतीय शेअर बाजार प्रचंड अस्थिर झाला आहे. कधी कोणता शेअर आपटेल आणि कधी कोणता रॉकेट होईल, काही सांगता येत नाही. अशा परिस्थितीत शहाण्या माणसाने आगीशी न खेळलेलच बरं. जर तुम्ही देखील शेअर बाजारात थेट गुंतवणूक करण्याचा धोका पत्करू शकत नसाल, तर तुमच्यासाठी म्युच्युअल फंड हा एक चांगला पर्याय आहे. येथे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा अभ्यास करण्याची गरज नाही. फंड मॅनेजर तुमच्यासाठी हे काम करतात. शिवाय येथे मोठी रक्कम गुंतवण्याचीही आवश्यकता नाही. तुम्ही अगदी १०० रुपयांपासून गुंतवणूक करू शकता. मात्र, म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यासाठी ५ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. म्हणजे घेतलेल्या निर्णयाचा पश्चाताप होणार नाही.
तुमची आर्थिक उद्दिष्टे
गुंतवणूक करण्यासाठी पहिला प्रश्न स्वतःला विचारा की तुम्ही गुंतवणूक का करत आहात? तुमची आर्थिक उद्दिष्टे काय आहेत आणि तुम्ही किती जोखीम घेऊ शकता? एकदा तुम्हाला हे कळले की, म्युच्युअल फंड निवडणे सोपे होईल. उदाहरणार्थ, तुम्हाला दीर्घकालीन सेवानिवृत्तीसाठी गुंतवणूक करायची असेल, तर ग्रोथ ऑरिएंटेड फंड योग्य असेल.
निधीचा प्रकार
तुम्ही कोणत्या प्रकारचा फंड निवडता हे खूप महत्वाचे आहे. जर तुम्ही कुठल्याही अभ्यास न करता म्युच्युअल फंड निवडला असेल तर नंतर पश्चाताप करावा लागू शकतो. तुम्हाला प्रथम विविध प्रकारचे म्युच्युअल फंड समजून घेणे आवश्यक आहे. तुमच्या गुंतवणुकीच्या पोर्टफोलिओला अनुकूल असलेले फंड निवडा. उदाहरणार्थ, जर तुम्हाला जास्त जोखीम घेऊन जास्त परतावा मिळवायचा असेल तर तुम्ही इक्विटी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकता. डेट फंड बॉण्ड्स सारख्या निश्चित उत्पन्न सिक्युरिटीजमध्येही गुंतवणूक करतात. येथे धोका कमी आहे. तर, हायब्रीड फंड जोखीम आणि परतावा यांच्यातील समतोल राखून इक्विटी आणि कर्ज या दोन्हीमध्ये गुंतवणूक करतात. तुम्हाला एखाद्या विशिष्ट क्षेत्रात गुंतवणूक करायची असल्यास, तुम्ही थीमॅटिक फंडांमध्ये पैसे गुंतवू शकता.
फंड कामगिरी
फंडाची निवड करताना, भूतकाळात त्याची कामगिरी कशी आहे हे पाहणे फार महत्वाचे आहे. वेगवेगळ्या कालमर्यादेत फंडाचा परतावा तपासा. हे तुम्हाला फंडाची स्थिरता आणि बाजारातील विविध परिस्थितींमध्ये त्याच्या कामगिरीबद्दल माहिती देईल.
लोड स्ट्रक्चर
म्युच्युअल फंड निवडताना एक्झिट लोडचा विचार केला पाहिजे. तुम्ही ठराविक वेळेपूर्वी तुमचे युनिट रिडीम केल्यास म्युच्युअल फंड कंपनी तुमच्याकडून एक्झिट लोड आकारेल. हे पैसे लवकर काढल्यावर घेतले जातात. जर तुम्हाला तुमची गुंतवणूक लवकर रिडीम करायची असेल आणि फंडाने एक्झिट लोड लादला तर यामुळे तुमचा परतावा कमी होऊ शकतो.
फंडाचा एक्सपेन्स रेश्यो
कुठलाही म्युच्युअल फंड आपले पैसे गुंतवणूक करण्याचे शुल्क घेते, त्याला एक्सपेन्स रेश्यो असे म्हणतात. हा वेगवेगळ्या फंडानुसार बदलतो. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी याची माहिती असणे आवश्यक आहे. कारण, याचा परिणाम थेट तुमच्या परताव्यावर होणार असतो. कमी खर्चाचे प्रमाण असलेले फंड निवडणे म्हणजे तुमचे जास्त पैसे गुंतवलेले राहतील.