Mutual Funds : भारतीय म्युच्युअल फंड्स बाजारात नोव्हेंबर महिन्यात गुंतवणूकदारांनी जोरदार 'कमबॅक' केलं आहे. विशेषतः इक्विटी म्युच्युअल फंड्समध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक वाढली आहे. म्युच्युअल फंड संघटनेच्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबरमध्ये इक्विटी फंड्समध्ये २४,६९० कोटींची गुंतवणूक झाली होती, जी नोव्हेंबरमध्ये थेट २१% ने वाढून २९,९११ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. यामध्ये गुंतवणूकदारांनी कोणत्या योजनेत सर्वाधिक गुंतवणूक केली हे देखील समोर आलं आहे.
मागील वर्षीच्या नोव्हेंबर २०२४ मधील ३५,९४३ कोटींच्या तुलनेत यंदा १७% घट झाली असली तरी, महिन्या-दर-महिना आकडेवारीत वाढ दिसून आली आहे.
इक्विटी फंड्समध्ये कोणत्या कॅटेगरीत सर्वाधिक ओघ?
नोव्हेंबर महिन्यात एकूण ११ उप-कॅटेगरींपैकी केवळ डिव्हिडंड यील्ड आणि ईएलएसएस फंड्स वगळता इतर सर्व फंड्समध्ये पैसा आला आहे.
| इक्विटी फंड कॅटेगरी | नोव्हेंबरमधील निव्वळ गुंतवणूक |
| फ्लेक्सी कॅप फंड्स | ८,१३५ कोटी (सर्वाधिक पसंती) |
| लार्ज ॲन्ड मिड कॅप फंड्स | ४,५०३ कोटी |
| मिड कॅप फंड्स | ४,४८६ कोटी |
| स्मॉल कॅप फंड्स | ४,४०६ कोटी |
| व्हॅल्यू/कॉन्ट्रा फंड्स | १,२१९ कोटी (ऑक्टोबरपेक्षा २३१% जास्त) |
गुंतवणूकदारांनी आजही फ्लेक्सी कॅप फंड्सना सर्वात सुरक्षित मानले असून, सर्वाधिक ८,१३५ कोटींची गुंतवणूक यात झाली. तर व्हॅल्यू/कॉन्ट्रा फंड्समध्ये ऑक्टोबरमधील ३६८ कोटींच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये २३१% ची मोठी वाढ झाली आहे. लार्ज ॲन्ड मिड कॅप फंड्समध्ये ऑक्टोबरच्या तुलनेत ४२% अधिक गुंतवणूक झाली.
डेटमधून २५,६९२ कोटींची माघार
इक्विटी फंड्सच्या उलट, डेट म्युच्युअल फंड्सची अवस्था नोव्हेंबरमध्ये खूपच खराब राहिली. नोव्हेंबरमध्ये डेट फंड्समधून तब्बल २५,६९२ कोटी रुपये काढून घेण्यात आले, तर ऑक्टोबरमध्ये १.५९ लाख कोटींचा ओघ होता. ओव्हरनाईट फंड्समधून ३७,६२४ कोटी आणि लिक्विड फंड्समधून १४,०५० कोटी रुपये गुंतवणूकदारांनी काढून घेतले आहेत. तर क्रेडिट रिस्क फंड्समधून सलग ३२ महिन्यांपासून (जवळपास अडीच वर्षे) पैसा बाहेर जाण्याचे सत्र थांबलेले नाही.
हायब्रीड आणि इतर फंड्सची स्थिती
- हायब्रीड फंड्समध्ये या फंड्समध्ये ₹१३,२९९ कोटी आले, परंतु ऑक्टोबरच्या तुलनेत ६% घट झाली.
- इक्विटी सेव्हिंग्ज फंड्सना १,०९१ कोटी मिळाले, म्हणजेच गुंतवणूकदारांनी थोडा शेअर आणि थोडा डेट असलेला सुरक्षित मिक्स पसंत केला.
- पॅसिव फंड्स : इंडेक्स फंड्स आणि गोल्ड ईटीएफमध्ये एकूण १५,३८५ कोटी रुपये आले, जे ऑक्टोबरपेक्षा ८% कमी होते.
- गोल्ड ETF मध्ये ऑक्टोबरच्या ७,७४३ कोटींच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये केवळ ३,७४२ कोटी रुपये आले.
- इतर ETF मध्ये मात्र वाढ झाली आणि ९,७२१ कोटी रुपये जमा झाले.
- सेक्टोरल/थीमॅटिक फंड्समध्ये ऑक्टोबरच्या तुलनेत गुंतवणूक वाढून १,८६५ कोटी रुपये झाली.
वाचा - गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! BoAt कंपनीच्या कारभारात गंभीर त्रुटी, नियमांचे उल्लंघन झाल्याचे उघड
नोव्हेंबर महिन्यात संपूर्ण म्युच्युअल फंड इंडस्ट्रीत केवळ ३३,२२२ कोटीचा निव्वळ ओघ राहिला, जो ऑक्टोबरच्या २.१५ लाख कोटींच्या तुलनेत ८५% कमी आहे. याचे मुख्य कारण डेट फंड्समधून झालेली मोठ्या प्रमाणात माघार आहे.
