Postal Life Insurance : सध्याच्या धकाधकीच्या काळात कधी कोणाला काय होईल सांगता येत नाही. अनेकदा तुमच्या आसपास चालतीबोलती माणसं गेल्याचा अनुभव तुम्हाला असेल. अशा परिस्थितीत आयुष्यात आर्थिक स्थिरता आणि सुरक्षितता जपण्यासाठी जीवन विमा घेणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्ही कमी प्रीमियममध्ये उत्तम कव्हरेज देणाऱ्या चांगल्या योजनेच्या शोधात असाल, तर पोस्ट ऑफिसची 'पोस्टल लाइफ इन्शुरन्स' योजना तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकते.
पोस्टल लाइफ इन्शुरन्स अंतर्गत येणाऱ्या होल लाइफ ॲश्युरन्स-सुरक्षा योजनेत तुम्हाला ५० लाख रुपयांपर्यंतचा विमा आणि बोनस मिळवण्याची संधी आहे. या योजनेबद्दल सविस्तर माहिती आणि तिचे फायदे जाणून घ्या.
पोस्टल लाइफ इन्शुरन्स : सुरक्षा योजना
पोस्टल लाइफ इन्शुरन्स ही पोस्ट ऑफिसची सर्वात जुनी आणि विश्वासार्ह योजना आहे. 'सुरक्षा' नावाची ही योजना दीर्घकालीन आर्थिक संरक्षण देते.
पात्रता : १९ वर्षांपासून ५५ वर्षांपर्यंतचा कोणताही भारतीय नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतो.
कव्हरेज: या योजनेत कमीत कमी २०,००० रुपये आणि जास्तीत जास्त ५० लाख रुपयांपर्यंतची विम्याची रक्कम आणि बोनस दिला जातो.
या योजनेचे मोठे फायदे
पोस्ट ऑफिसच्या या लाइफ इन्शुरन्स स्कीममध्ये केवळ विम्याचे संरक्षण नाही, तर अनेक अतिरिक्त सुविधा मिळतात, ज्यामुळे ही योजना अधिक आकर्षक ठरते.
- आयकर सवलत: या योजनेत केलेल्या गुंतवणुकीवर आयकर कायद्याच्या कलम ८० सी अंतर्गत कर सवलत मिळते.
- कर्ज सुविधा: पॉलिसी सुरू झाल्यापासून ४ वर्षे पूर्ण झाल्यावर ग्राहकांना त्यावर कर्ज घेण्याचा लाभ मिळतो.
- प्रीमियम भरण्याची लवचिकता: तुम्ही तुमच्या सोयीनुसार मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक आधारावर प्रीमियम भरू शकता.
- देशभर ट्रान्सफर सुविधा: तुमची नोकरी बदलल्यास किंवा तुम्ही स्थलांतरित झाल्यास, ही पॉलिसी देशातील कोणत्याही भागात हस्तांतरित करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
- यापूर्वी ही योजना फक्त सरकारी आणि अर्ध-सरकारी कर्मचाऱ्यांसाठी होती, परंतु २०१७ पासून ती कोणत्याही भारतीय नागरिकासाठी खुली करण्यात आली आहे.
वाचा - गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! पाहा ११ कोटी रुपयांच्या १० किलो सोन्याच्या 'दुबई ड्रेस'चे खास फोटो
पोस्ट ऑफिसच्या इतर इन्शुरन्स योजना
'सुरक्षा' व्यतिरिक्त, पोस्टल लाइफ इन्शुरन्स अंतर्गत कुटुंबाच्या विविध गरजांसाठी इतर योजनाही उपलब्ध आहेत, त्या अशा:
- कन्व्हर्टिबल होल लाइफ ॲश्युरन्स
- एंडोमेंट ॲश्युरन्स
- जॉईंट लाइफ इन्शुरन्स
- प्रत्याशित एंडोमेंट ॲश्युरन्स
- बाल जीवन विमा