Pradhan Mantri Suraksha Bima Yojana : सध्या आयुष्य खूप अनिश्चित झाले आहे. कधी काय होईल काही सांगता येत नाही. अशा परिस्थितीत आपल्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबाची सुरक्षा आपण करुन ठेवायला हवी. यासाठी केंद्र सरकारची 'प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना' सर्वसामान्यांसाठी वरदान ठरत आहे. वर्षाला केवळ २० रुपये खर्च करून २ लाख रुपयांचा अपघात विमा देणारी ही योजना आता देशातील ५१ कोटींहून अधिक लोकांपर्यंत पोहोचली आहे. गेल्या १० वर्षांत या योजनेच्या माध्यमातून ३,१२१ कोटी रुपयांहून अधिक मदतीचे वाटप करण्यात आले आहे.
काय आहे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना?
ही एक अत्यंत स्वस्त 'अपघात विमा' योजना आहे. २०१५ मध्ये सुरू झालेल्या या योजनेने २०२५ मध्ये १० यशस्वी वर्षे पूर्ण केली आहेत. विमाधारकाचा अपघातात मृत्यू झाल्यास वारसाला २ लाख रुपये मिळतात. अपघातात दोन्ही डोळे किंवा दोन्ही हात-पाय निकामी झाल्यास २ लाख रुपये आणि एका अवयवाचे नुकसान झाल्यास १ लाख रुपयांची मदत मिळते.
पात्रता आणि वयोमर्यादा
- १८ ते ७० वर्षे वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतो.
- वयाची ७० वर्षे पूर्ण होताच हा विमा आपोआप समाप्त होतो.
- अर्जदाराचे बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते असणे अनिवार्य आहे.
अर्ज कसा करावा?
- तुम्ही तुमच्या बँकेच्या किंवा पोस्ट ऑफिसच्या शाखेत जाऊन अर्ज करू शकता. तसेच 'उमंग' ॲप किंवा बँकेच्या नेट बँकिंगद्वारे ऑनलाइन अर्जही उपलब्ध आहे.
- अर्जामध्ये तुमची वैयक्तिक माहिती आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे 'वारसदार' यांची माहिती अचूक भरा.
- वर्षाला २० रुपये प्रीमियम तुमच्या खात्यातून आपोआप कापला जावा यासाठी 'ऑटो-डेबिट'चा पर्याय निवडा.
- हा विमा दरवर्षी १ जून ते ३१ मे या कालावधीसाठी वैध असतो. त्यामुळे ३१ मे पूर्वी नूतनीकरण करणे गरजेचे असते.
वाचा - तुमचे 'मनी मॅनेजमेंट' किती स्ट्रॉन्ग आहे? सरकारी क्विझ खेळा आणि रोख १०,००० रुपये मिळवा
दावा कसा करावा?
- दुर्दैवाने विमाधारकाचा मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास, नॉमिनीने ३० दिवसांच्या आत संबंधित बँकेत दावा दाखल करणे आवश्यक आहे.
- आवश्यक कागदपत्रे : आधार कार्ड, पॅन कार्ड, मृत्यू प्रमाणपत्र (मृत्यू झाल्यास) किंवा वैद्यकीय प्रमाणपत्र (अपंगत्व आल्यास).
- निकालाचा कालावधी : सर्व कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर साधारणपणे ३० दिवसांच्या आत विमा रक्कम थेट खात्यात जमा केली जाते.
