Health Insurance Policy 2025: आजच्या काळात गंभीर आजारांचे उपचार इतके महाग झाले आहेत की, अनेकांना आपल्या आयुष्यभराची कमाई गमवावी लागते. अशा परिस्थितीत आरोग्य विमा (Health Insurance) मोठा आधार ठरतो. मात्र, अनेकदा लोक हेल्थ पॉलिसी घेतात पण त्यात गंभीर आजारांचा (Critical Illness) समावेश करत नाहीत. त्यामुळे जेव्हा खरोखर मोठा आजार होतो, तेव्हा त्यांचा साठवलेला सर्व पैसा उपचारांवर खर्च होतो.
गंभीर आजारांचे कव्हर आहे का, तपासा
जर तुम्ही हेल्थ इन्शुरन्स घेतला असेल, तर सर्वप्रथम हे तपासा की, तुमच्या पॉलिसीत गंभीर आजारांचे कव्हर आहे का नाही. कारण अशा आजारांच्या उपचारांचा कालावधी लांब असतो आणि खर्चही प्रचंड असतो. त्यामुळे पॉलिसी घेताना हा मुद्दा स्पष्ट करणे आवश्यक आहे, जेणेकरून भविष्यात तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबाला आर्थिक अडचण येऊ नये.
पॉलिसी निवडताना लक्षात घ्या या गोष्टी
विमा कंपन्या विविध प्रकारच्या हेल्थ पॉलिसी देतात आणि त्यांचे प्रीमियम वेगवेगळे असतात. काही कंपन्या शेकडो आजारांवर कव्हर देतात. त्यामुळे पॉलिसी निवडताना गंभीर आजारांचा समावेश असलेली योजना घेणे अधिक फायद्याचे ठरते.
जर तुमच्याकडे आधीच हेल्थ पॉलिसी असेल, तर तुम्ही त्यात “Add-on” किंवा अतिरिक्त कव्हर जोडू शकता. त्यामुळे जुनी पॉलिसी बदलण्याची गरज न पडता तुम्हाला अधिक सुरक्षा मिळते.
सीआय रायडर म्हणजे काय?
सीआय रायडर (Critical Illness Rider) हा एक अतिरिक्त विमा कव्हर असतो, जो तुम्ही टर्म लाइफ इन्शुरन्स पॉलिसीत जोडू शकता. या कव्हरखाली तुम्हाला कॅन्सर, हार्ट अटॅक, स्ट्रोक, किडनी फेल्युअर किंवा काही मोठ्या सर्जरींसाठी आर्थिक मदत मिळते.
या योजनेअंतर्गत विमाधारकाला आजाराचे निदान झाल्यानंतर एकरकमी रक्कम (Lump Sum Payment) दिली जाते. ही रक्कम उपचाराच्या खर्चासाठी, औषधोपचारासाठी किंवा कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षेसाठी वापरता येते.
