Bajaj Allianz Deal : तुम्ही जर बजाज-अलायन्झची पॉलिसी खरेदी केली असेल तर ही बातमी तुमच्यासाठी फार महत्त्वाची आहे. भारतीय कॉर्पोरेट क्षेत्रातील एक ऐतिहासिक भागीदारी आता संपुष्टात आली आहे. बजाज फिनसर्व्हने आपली जर्मन भागीदार कंपनी अलायन्झ सोबतचा २४ वर्षांचा जुना संबंध अधिकृतपणे संपवला आहे. बजाज समूहाने अलायन्झचा २३ टक्के हिस्सा तब्बल २१,३९० कोटी रुपयांना खरेदी केला असून, आता दोन्ही विमा कंपन्यांचे पूर्ण नियंत्रण बजाजच्या हाती येणार आहे.
२१,३९० कोटींची मोठी डील
बजाज जनरल इन्शुरन्सने अलायन्झचा २३% हिस्सा १२,१९० कोटी रुपयांना खरेदी केला. तर बजाज लाईफ इन्शुरन्सने अलायन्झचा २३% हिस्सा ९,२०० कोटी रुपयांना खरेदी केला. या डीलमुळे बजाज फिनसर्व्हची दोन्ही कंपन्यांमधील मालकी ७४ टक्क्यांवरून ९७ टक्क्यांपर्यंत वाढली आहे. उर्वरित ३ टक्के हिस्सा येत्या जुलैपर्यंत 'शेअर बायबॅक'च्या माध्यमातून पूर्ण केला जाईल, ज्यामुळे बजाजचा या कंपन्यांवर १००% ताबा असेल.
रणनीतिक स्वातंत्र्य आणि विस्तार
या महत्त्वाच्या टप्प्यावर बोलताना बजाज फिनसर्व्हचे अध्यक्ष संजीव बजाज म्हणाले, "या करारामुळे आम्हाला रणनीतिक स्वातंत्र्य मिळाले आहे. आता आम्ही नवीन बाजारपेठांमध्ये विस्तार करू शकू आणि नवनवीन विमा उत्पादने सादर करू शकू. भारताचे विमा क्षेत्र पुढील २० वर्षांत झपाट्याने वाढणार असून, ही डील कंपनीला अधिक मोठी बनवण्यासाठी मैलाचा दगड ठरेल."
पॉलिसीधारकांनो निर्धास्त राहा!
या मोठ्या फेरबदलामुळे ग्राहकांच्या मनात शंका असणे स्वाभाविक आहे, मात्र कंपनीने काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. तुमची जुनी पॉलिसी तशीच सुरू राहील, ती पुन्हा इश्यू करण्याची गरज नाही. क्लेम सेटलमेंटची प्रक्रिया, कस्टमर सर्व्हिस आणि सपोर्ट सिस्टीममध्ये कोणताही बदल होणार नाही. दोन्ही कंपन्यांचे मुख्य कार्यालय पुण्यातच राहील. रोजच्या कामकाजावर किंवा बिझनेस पार्टनर्सवर याचा कोणताही परिणाम होणार नाही.
वाचा - चांदीत गुंतवणुकीची घाई नको! २०२९ पर्यंत कशी असेल चाल? जागतिक बँकेने सांगितली रणनीती
विमा क्षेत्रातील बदलती समीकरणे
गेल्या २० वर्षांत भारतीय विमा क्षेत्र दरवर्षी सरासरी १७% वेगाने वाढत आहे. केंद्र सरकारने विमा क्षेत्रातील एफडीआय मर्यादा ७४% वरून १००% केल्यामुळे अशा प्रकारच्या विलीनीकरणाचे मार्ग मोकळे झाले आहेत. या आर्थिक वर्षाच्या अखेरीस विमा बाजार २० लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.
