Infosys working hours : काही महिन्यांपूर्वी इन्फोसिसचे संस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांनी भारतीय तरुणांनी आठवड्यातून ७० तास काम करावे, असे आवाहन केले होते. यावरून देशभरात मोठी चर्चा आणि वादंग निर्माण झाला होता. पण, आता खुद्द इन्फोसिस कंपनीनेच या कल्पनेला 'मूक विरोध' दर्शवला आहे असे दिसते. इन्फोसिसने आपल्या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त कामाचे तास नोंदवल्यास इशारा देणारे ईमेल पाठवणे सुरू केले आहे. हे नारायण मूर्तींच्या आवाहनापेक्षा पूर्णपणे वेगळे आहे.
कसे काम करते ही नवीन प्रणाली?
द इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, इन्फोसिसने एक स्वयंचलित प्रणाली सुरू केली आहे. ही प्रणाली कर्मचारी दररोज किती वेळ काम करतात, विशेषतः रिमोटली काम करताना, याचा मागोवा घेते. जर एखादा कर्मचारी सलग ९ तास १५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ काम करत असेल, तर त्याला थेट एचआर (HR) विभागाकडून औपचारिक सूचना मिळते.
एका इन्फोसिस कर्मचाऱ्याने ईटीला सांगितले की, "जर आपण रिमोटली काम करताना दैनंदिन मर्यादा ओलांडली, तर सिस्टम एक सूचना ट्रिगर करते." दरमहा पाठवल्या जाणाऱ्या या सूचनांमध्ये रिमोट कामाचे दिवस, कामाचे एकूण तास आणि दैनंदिन सरासरी यांचा सविस्तर उल्लेख असतो.
इन्फोसिस कशावर भर देते?
इन्फोसिसने ईमेलमध्ये म्हटले आहे की ते कर्मचाऱ्यांच्या वचनबद्धतेची प्रशंसा करतात, परंतु निरोगी काम आणि जीवन संतुलन (Work-Life Balance) राखण्याची गरज खूप महत्त्वाची आहे. ईमेलमध्ये असेही म्हटले आहे की, "तुमच्या कल्याणासाठी आणि दीर्घकालीन व्यावसायिक यशासाठी निरोगी काम आणि जीवन संतुलन राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे."
कंपनीला माहित आहे, की कामाच्या मागण्या आणि अंतिम मुदतीमुळे कधीकधी जास्त तास काम करावे लागू शकते. तरीही, "उत्पादकता आणि एकूण आनंद वाढवण्यासाठी कामाचे वेळापत्रक संतुलित ठेवणे महत्त्वाचे आहे," असे ईमेलमध्ये पुढे नमूद केले आहे.
कंपनी कर्मचाऱ्यांना काय सल्ला देत आहे?
एचआरने कर्मचाऱ्यांना कामाच्या वेळेबाबत काही महत्त्वाचे सल्ले दिले आहेत.
- तुमच्या कामाच्या दिवसात नियमित विश्रांती घ्या.
- तुम्हाला जास्त काम वाटत असेल किंवा कामांच्या प्राधान्यक्रमांचा आढावा घेण्यासाठी मदतीची आवश्यकता असेल, तर तुमच्या व्यवस्थापकाला कळवा.
- योग्यतेनुसार कामे सोपवण्याबद्दल किंवा काही जबाबदाऱ्यांचे पुनर्वितरण करण्याबद्दल तुमच्या व्यवस्थापकाशी बोला.
- ऑफ-अवर्समध्ये (कामाच्या वेळेव्यतिरिक्त) रिचार्ज करण्यासाठी वेळ काढा आणि शक्य असेल तेव्हा कामाशी संबंधित संवाद कमीत कमी करा.
हायब्रिड मॉडेल आणि कर्मचाऱ्यांचे कल्याण
इन्फोसिसने हायब्रिड मॉडेलमध्ये बदल केल्यानंतर ही देखरेख प्रणाली सुरू केली आहे. या मॉडेलमध्ये कर्मचाऱ्यांना महिन्यातून किमान १० दिवस ऑफिसमधून काम करणे बंधनकारक आहे. हा निर्णय भारतातील आयटी (IT) क्षेत्रात कर्मचाऱ्यांच्या कल्याणावर वाढत असलेल्या भरचे संकेत देतो. जिथे दीर्घ कामाच्या वेळेऐवजी मानसिक आरोग्य आणि शाश्वत उत्पादकता यांना प्राधान्य दिले जात आहे.
वाचा - अमेरिका-चीन व्यापार युद्धात अंबानींची एन्ट्री? बीजिंगला जाणारे गॅस जहाज आता थेट भारतात!
नारायण मूर्तींच्या ७० तासांच्या कामाच्या सूचनेला इन्फोसिसने आपल्या धोरणातून एक वेगळा मार्ग निवडल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. कंपनी आता जास्त काम करण्याऐवजी कर्मचाऱ्यांच्या आरोग्याला आणि कामातील संतुलनाला प्राधान्य देत आहे.