Indian Airlines: लवकरच भारतात नवीन दोन एअरलाईन्स सुरू होणार आहेत. देशातील विमान वाहतूक क्षेत्राला चालना देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारकडून दोन नवीन एअरलाईन्सना आवश्यक परवानग्या देण्यात आल्याची माहिती माहिती नागरी उड्डयन मंत्री राम मोहन नायडू यांनी दिली. ‘अल हिंद एअर’ आणि ‘फ्लाय एक्सप्रेस’ अशी या दोन कंपन्यांची नावे आहेत.
इंडिगो संकटाने प्रवाशांना नाहक त्रास
देशातील सर्वात मोठी एअरलाईन असलेल्या इंडिगोच्या प्रणालीत अलीकडे बिघाड झाला होता. यामुळे संपूर्ण देशाची विमानसेवा विस्कळीत झाली. हजारो प्रवाशांना तासन्तास विमानतळांवर थांबावे लागले, अनेक जण आपल्या गंतव्यस्थानी पोहोचू शकले नाहीत. या घटनेमुळे भारतीय विमानवाहतूक क्षेत्रात मोजक्या कंपन्यांचे वर्चस्व किती धोकादायक ठरू शकते, हे स्पष्ट झाले. या पार्श्वभूमीवर सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
Union Minister of Civil Aviation, Ram Mohan Naidu Kinjarapu, tweets, "Over the last week, pleased to have met teams from new airlines aspiring to take wings in Indian skies—Shankh Air, Al Hind Air and FlyExpress. While Shankh Air has already got the NOC from Ministry, Al Hind… pic.twitter.com/jIUKPoZ3ck
— ANI (@ANI) December 24, 2025
दोन कंपन्यांचे वर्चस्व कमी करण्याचा प्रयत्न
सध्या देशांतर्गत विमानप्रवास करणाऱ्या सुमारे 90 टक्के प्रवाशांकडून इंडिगो आणि टाटा समूहाच्या (एअर इंडिया) सेवांचा वापर केला जातो. अशा परिस्थितीत एका मोठ्या एअरलाईनमध्ये अडचण निर्माण झाली, तर संपूर्ण व्यवस्थेवर त्याचा परिणाम होतो. ही जोखीम कमी करण्यासाठी सरकारने नव्या एअरलाईन्सना प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्री राम मोहन नायडू यांनी सांगितले की, बाजारातील एकाधिकार कमी करून प्रवाशांना अधिक पर्याय देणे हा या निर्णयाचा मुख्य उद्देश आहे. गेल्या आठवड्यात मंत्रालयाने तीन नव्या विमान कंपन्यांच्या प्रतिनिधींशी बैठकाही घेतल्या आहेत.
नव्या एअरलाईन्स कोणत्या?
अल हिंद एअर – केरळस्थित अलहिंद ग्रुपची ही कंपनी असून, हा समूह आधीपासूनच ट्रॅव्हल आणि टुरिझम क्षेत्रात सक्रिय आहे.
फ्लाय एक्सप्रेस – हैदराबादस्थित ही कंपनी असून, कुरिअर आणि कार्गो सेवांचा अनुभव तिच्या पाठीशी आहे.
याशिवाय, शंख एअर या आणखी एका एअरलाईनला यापूर्वीच एनओसी मिळाली आहे. शंख एअर उत्तर प्रदेशातील लखनऊ, वाराणसी, आग्रा आणि गोरखपूर यांसारख्या शहरांना जोडण्याची योजना आखत आहे.
टियर-2 आणि टियर-3 शहरांसाठी दिलासा
सरकारच्या ‘उडान’ योजनेअंतर्गत स्टार एअर आणि फ्लाय91 यांसारख्या लहान एअरलाईन्स आधीच कार्यरत आहेत. आता अल हिंद एअर, फ्लाय एक्सप्रेस आणि शंख एअरमुळे टियर-2 आणि टियर-3 शहरांची हवाई जोडणी अधिक मजबूत होण्याची शक्यता आहे. यामुळे प्रवाशांना अधिक पर्याय, स्पर्धात्मक भाडे आणि चांगली सेवा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
