Nirmala Sitharaman On Fall of Rupees: भारतीय रुपया सध्या त्याच्या विक्रमी नीचांकी पातळीजवळ असला तरी, देशाची मजबूत आर्थिक स्थिती पाहता रुपयाबद्दल जास्त चिंता करण्याची गरज नाही, असं मत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी व्यक्त केलंय.
"रुपया आपला मार्ग स्वतःच तयार करेल. रुपयाबाबत होणारी चर्चा जुन्या परिस्थितीनुसार न पाहता, सध्याच्या आर्थिक वास्तवाच्या आधारावर पाहिली पाहिजे," असं निर्मला सीतारामन म्हणाल्या. जेव्हा देशाची अर्थव्यवस्था मजबूत असते आणि विकासदर वेगवान असतो, तेव्हा रुपया-डॉलर विनिमय दर त्याच संदर्भात समजून घेतला पाहिजे, यावर सीतारमण यांनी भर दिला.
Zepto IPO ला मिळाला हिरवा झेंडा; शेअरहोल्डर्सच्या मंजुरीनंतर कंपनी तयार, केव्हा होणार लिस्टिंग?
सर्वकालीन नीचांकी पातळी गाठली होती
४ डिसेंबरला भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत ₹९०.४६ च्या सर्वकालीन नीचांकी पातळीवर घसरला होता. भारत-अमेरिका व्यापार कराराला होणारा विलंब आणि सातत्यानं काढली जाणारी परदेशी गुंतवणूक हे याचं मुख्य कारण असल्याचं सांगितलं जात आहे. विशेष म्हणजे, देशात किरकोळ महागाई विक्रमी पातळीवर कमी असून जीडीपी वाढ ८% पेक्षा जास्त असताना ही घसरण झाली आहे.
अर्थमंत्र्यांच्या मते, रुपया कमकुवत होतो तेव्हा सामान्यतः निर्यातदारांना याचा फायदा होतो, विशेषतः अशा वेळी जेव्हा अमेरिकेनं अनेक आयात केलेल्या वस्तूंवर टॅरिफ लावले आहेत. तथापि, केवळ याच कारणामुळे रुपयाची घसरण 'फायद्या'च्या रूपात मांडणं हे संपूर्ण समाधानकारक तर्क नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. हिंदुस्तान टाइम्स लीडरशिप समिट या कार्यक्रमात बोलताना त्यांनी यावर भाष्य केलं.
अर्थ मंत्रालयाचे मत
भारतीय अर्थव्यवस्थेची गती यापुढेही कायम राहील, असं अर्थ मंत्रालयाचे मत आहे. दुसऱ्या तिमाहीत (Q2FY26) जीडीपी वाढ ८.२% च्या सहा-तिमाही उच्च पातळीवर पोहोचली. ऑक्टोबरमध्ये किरकोळ महागाई ०.२५% वर आला, जी एक विक्रमी नीचांकी पातळी आहे. सीतारमण यांनी विश्वास व्यक्त केला की, यावर्षी (FY26) आर्थिक वाढ ७% किंवा त्याहून अधिक असू शकते. त्या म्हणाल्या की, आज भारताची आर्थिक स्थिती अनेक मोठ्या देशांच्या तुलनेत खूप स्थिर आणि वेगवान आहे आणि हेच मुख्य कारण आहे की रुपया घसरत असूनही अर्थव्यवस्थेची पायाभूत तत्त्वं मजबूत राहिली आहेत.
आयकर कपातीवर वक्तव्य
आयकर कपात आणि जीएसटी दरांचे सुलभीकरण या दोन मोठ्या सुधारणांवर बोलताना अर्थमंत्र्यांनी सांगितलं की, त्यांच्या प्रभावाचं योग्य मूल्यांकन आगामी काळात दिसून येईल. आयकर बदलांचा परिणाम पुढील वर्षी कर संकलनात स्पष्टपणे दिसून येईल, परंतु सामान्य लोकांच्या खर्चात वाढ आतापासूनच दिसू लागली आहे, असं त्यांनी सांगितलं. दुसरीकडे, जीएसटीमध्ये झालेले बदल संपूर्ण देशात समान स्वरूपात लागू होतात, त्यामुळे त्यांचे परिणाम मध्यम कालावधीत पाहणे अधिक योग्य ठरेल, असंही सीतारामन म्हणाल्या.
