Stock Market Tax Rules India: शेअर बाजार हा केवळ बुद्धीचा नाही, तर धैर्याचाही खेळ आहे. येथे कधी गुंतवणूकदार शिखरावर असतो, तर कधी जमिनीवर. पण गुंतवणूकदारांची खरी डोकेदुखी तेव्हा सुरू होते, जेव्हा ते तोट्यातून सावरून नफ्याकडे वाटचाल करू लागतात. गेल्या वर्षी मोठा तोटा सहन केल्यानंतर यावर्षी ज्यांना 'रिकव्हरी' मिळाली आहे, त्यांच्या मनात एकच प्रश्न आहे, "माझ्या या नफ्यावर सरकारला टॅक्स द्यावा लागेल का?" इनकम टॅक्सच्या नियमांमधील 'सेट-ऑफ' हा एक असा जादुई नियम आहे, जो तुम्हाला या परिस्थितीत टॅक्स वाचवण्यासाठी मोठी मदत करू शकतो.
काय आहे 'सेट-ऑफ'चा गणित?
समजा, गेल्या वर्षी तुम्हाला शेअर बाजारात २ लाख रुपयांचा तोटा झाला. यावर्षी तुम्ही पुन्हा जोमाने सुरुवात केली आणि १ लाख रुपये नफा कमावला. आता नियमानुसार, तुम्हाला या १ लाखावर टॅक्स भरायची गरज नाही. कारण, तुम्ही तुमचा जुना २ लाखांचा तोटा यावर्षीच्या १ लाख नफ्यासोबत 'ॲडजस्ट' करू शकता.
हिशोब सोपा आहे
एकूण तोटा : २,००,००० रुपये
एकूण नफा : १,००,००० रुपये
नेट बॅलन्स : - १,००,००० रुपये (म्हणजेच तुम्ही अजूनही तांत्रिकदृष्ट्या तोट्यातच आहात, त्यामुळे टॅक्स शून्य!)
सेट-ऑफचे महत्त्वाचे नियम
टॅक्स वाचवताना काही तांत्रिक गोष्टी समजून घेणे आवश्यक आहे.
- शॉर्ट टर्म कॅपिटल लॉस : जर तुम्ही शेअर १ वर्षाच्या आत विकून तोटा केला असेल, तर तो तोटा तुम्ही शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म अशा दोन्ही प्रकारच्या नफ्याशी जोडू शकता.
- लॉन्ग टर्म कॅपिटल लॉस : जर शेअर १ वर्षापेक्षा जास्त काळ बाळगून तोट्यात विकला असेल, तर त्याची भरपाई केवळ लॉंग टर्म नफ्यातूनच होऊ शकते.
- ८ वर्षांपर्यंतची सवलत : जर तुमचा तोटा यावर्षीच्या नफ्यापेक्षा जास्त असेल, तर तो तुम्ही पुढील ८ वर्षांपर्यंत 'कॅरी फॉरवर्ड' करू शकता. म्हणजेच पुढच्या वर्षी होणाऱ्या नफ्यातूनही हा जुना तोटा वजा करता येईल.
इंट्राडे आणि F&O साठी नियम वेगळे!
- जर तुमचा तोटा डिलिव्हरी शेअर्समध्ये नसून ट्रेडिंगमध्ये असेल, तर नियम बदलतात.
- इंट्राडे ट्रेडिंग : याचा तोटा केवळ 'इंट्राडे' नफ्यातूनच वजा होतो आणि तो फक्त ४ वर्षांपर्यंतच पुढे नेता येतो.
- फ्युचर्स अँड ऑप्शन्स : हा 'बिझनेस इन्कम' मानला जातो. याचा तोटा तुम्ही घराचे भाडे किंवा इतर उत्पन्नातून (पगार सोडून) ॲडजस्ट करू शकता.
'टॅक्स लॉस हार्वेस्टिंग'चा फंडा
बाजारातील अनुभवी खेळाडू वर्षाच्या शेवटी 'Tax Loss Harvesting' करतात. जर त्यांना वर्षअखेरीस मोठा नफा दिसत असेल, तर ते मुद्दाम तोट्यात असलेले शेअर्स विकतात. यामुळे त्यांचा एकूण नफा कागदोपत्री कमी होतो आणि टॅक्सचा बोजाही हलका होतो.
वाचा - गुंतवणुकीचे टेन्शन सोडा! सेबीचे नवे 'लाईफ सायकल फंड्स' वयानुसार बदलणार तुमचा पोर्टफोलिओ
जर तुम्ही तुमचे इनकम टॅक्स रिटर्न वेळेत फाईल केले नाही, तर आयकर विभाग तुम्हाला हा तोटा 'कॅरी फॉरवर्ड' करण्याची परवानगी देणार नाही. त्यामुळे नुकसान झाले असले तरी ITR वेळेत भरणे फायद्याचे ठरते.
