PAN Card : समाजवादी पक्षाचे नेते आझम खान आणि त्यांचा मुलगा अब्दुल्ला आझम यांना नुकतेच न्यायालयाने ७ वर्षांची शिक्षा सुनावली. या दोघांकडेही दोन पॅन कार्ड असल्याच्या आरोपाखाली, त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. यानंतर पॅन कार्डबाबत लोक जागरुक झाले असून गुगलवर सर्च करत आहेत. पॅन कार्ड हे आज देशातील सर्वात महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे. विशेषतः सर्व प्रकारच्या वित्तीय कामांसाठी पॅन कार्ड अनिवार्य आहे. पॅन कार्डवर व्यक्तीचे नाव आणि एक विशिष्ट पॅन क्रमांक असतो, जो प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळा असतो. नियमानुसार, एका व्यक्तीला फक्त एकच पॅन कार्ड ठेवण्याची परवानगी आहे. मात्र, जर एखाद्या व्यक्तीकडे दोन पॅन कार्ड आढळले, तर काय होते? एकापेक्षा जास्त असेल तर कुठे जमा करायचे? हे आज जाणून घेऊ.
दोन पॅन कार्ड ठेवणे गंभीर कायदेशीर गुन्हा
भारतात एकापेक्षा जास्त पॅन कार्ड बाळगणे हा कायदेशीर गुन्हा आहे. जर कोणत्याही व्यक्तीकडे दोन पॅन कार्ड आढळून आले, तर आयकर विभाग त्या व्यक्तीवर कठोर कायदेशीर कारवाई करतो. दोन पॅन कार्ड आढळल्यास आयकर विभाग त्या व्यक्तीवर आयकर अधिनियमच्या कलम २७२B अंतर्गत १०,००० रुपये पर्यंतचा दंड आकारू शकतो. प्रत्येक प्रकरणात तुरुंगवास होत नाही. परंतु, जर दुसऱ्या पॅन कार्डचा उपयोग व्यक्तीने फसवणूक, कर चोरी किंवा घोटाळा करण्यासाठी केला असेल, तर त्या व्यक्तीला कारावास होऊ शकतो.
लोक दोन पॅन कार्ड का बनवतात?
- दोन पॅन कार्ड ठेवणे गुन्हा असूनही, अनेक लोक खालील कारणांसाठी दुसरे पॅन कार्ड बनवतात.
- कर चोरी: दुसऱ्या पॅन कार्डचा उपयोग लोक आपले खरे उत्पन्न आणि आर्थिक व्यवहार आयकर विभागापासून लपवण्यासाठी करतात आणि कर चोरी करतात.
- ओळख लपवणे: काही लोक आपली खरी ओळख लपवण्यासाठी किंवा कोणत्याही प्रकारचा घोटाळा किंवा फ्रॉड करण्यासाठी दोन पॅन कार्ड वापरतात.
वाचा - मोबाईलवर मिनिटांत तपासा तुमचा NPS बॅलन्स; पाहा NSDL, उमंग ॲप आणि मिस्ड कॉलची सोपी पद्धत
तुमच्याकडे दोन पॅन कार्ड असल्यास घाबरू नका!
चुकीमुळे किंवा नकळतपणे तुमच्याकडे दोन पॅन कार्ड बनले असल्यास, घाबरून जाण्याची गरज नाही. तुम्ही तुमचे दुसरे पॅन कार्ड सहजपणे सरेंडर करू शकता. यासाठी तुम्हाला NSDL किंवा UTIITSL च्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. येथे 'Request for Surrender of Duplicate PAN' (डुप्लिकेट पॅन सरेंडर करण्याची विनंती) हा फॉर्म भरावा लागतो. हा फॉर्म भरल्यानंतर आयकर विभाग तुमचे दुसरे पॅन कार्ड निष्क्रिय करेल आणि तुम्ही कायदेशीर कारवाईपासून वाचू शकता. वेळेत हे काम पूर्ण करणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.
