EPF Interest Rate 2025: खासगी क्षेत्रात कार्यरत असलेल्या देशातील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारने गुड न्यूज दिली. केंद्र सरकारने आर्थिक वर्ष २०२५ साठी भविष्य निर्वाह निधीची घोषणा केली. याचा ७ कोटींपेक्षा जास्त लोकांना लाभ होणार आहे. त्यांच्या पीएफ खात्यांमध्ये नफा जमा होणार आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
केंद्र सरकारने सांगितले की, आर्थिक वर्ष २०२५ साठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर प्रतिवर्ष ८.२५ टक्के व्याज मिळेल. शनिवारी (२४ मे) सरकारने या निर्णयाला मंजुरी दिली.
ईपीएफओने २८ फेब्रुवारी रोजी आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर ८.२५ टक्के व्याज देण्याचा निर्णय कायम ठेवला होता. हा प्रस्ताव अर्थ मंत्रालयाच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आला होता. त्याला सरकारने मंजुरी दिली आहे.
सात कोटी सदस्यांच्या खात्यात येणार पैसे
कामगार मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, 'अर्थ मंत्रालयाने आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी ईपीएफ वर ८.२५ टक्के व्याजदर ठेवण्यास मंजुरी दिली आहे. कामगार मंत्रालयाने यासंदर्भात ईपीएफओला पत्रही पाठवले आहे.'
आर्थिक वर्ष २०२५ मध्ये मंजुरी मिळालेल्या व्याजदरानुसार व्याजाची रक्कम सात कोटींपेक्षा अधिक सदस्यांच्या खात्यात जमी केली जाणार आहे.
फेब्रुवारीमध्ये पीएफवरील व्याजदरात वाढ
२८ फेब्रुवारी रोजी नवी दिल्लीमध्ये केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली ईपीएफओच्या केंद्रीय न्यास मंडळाची बैठक झाली होती. २३७ व्या बैठकीत व्याजदराबद्दलचा निर्णय घेण्यात आला होता.
इतर गुंतवणुकीच्या योजनांपेक्षा ईपीएफ जास्त आणि सुरक्षित परतावा देतो. यामुळे निवृत्तीनंतरची बचत वाढते. ईपीएफओने २०२२-२३ च्या ८.१५ टक्के व्याजदरात वाढ करून फेब्रुवारी २०२३-२४ मध्ये ती ८.२५ टक्के इतकी केली होती.