Elon Musk Net Worth : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील 'टायकून' इलॉन मस्क यांनी श्रीमंतीचा नवा इतिहास रचला आहे. मस्क यांची एकूण संपत्ती आता ७५० अब्ज डॉलर्स (सुमारे ६७.१८ लाख कोटी रुपये) वर पोहोचली असून, हा आकडा गाठणारे ते जगातील पहिलेच व्यक्ती ठरले आहेत. विशेष म्हणजे, मस्क यांची ही संपत्ती जगातील दिग्गज टेक बिलियनेअर्स (लॅरी पेज, जेफ बेजोस आणि लॅरी एलिसन) यांच्या एकत्रित संपत्तीपेक्षाही अधिक आहे.
संपत्तीत 'रॉकेट' वेगाने वाढ होण्याची ३ प्रमुख कारणे
- टेस्ला पे-पॅकेज : डेलावेअर सुप्रीम कोर्टाने मस्क यांचे ५६ अब्ज डॉलर्सचे जुने स्टॉक ऑप्शन्स पॅकेज पुन्हा बहाल केले आहे. वाढलेल्या शेअरच्या किमतीनुसार या पॅकेजचे मूल्य आता १३९ अब्ज डॉलर्स झाले आहे.
- स्पेसएक्सचे गगनभरारी व्हॅल्युएशन : मस्क यांच्या अंतराळ संशोधन कंपनीचे मूल्य आता ८०० अब्ज डॉलर्स वर पोहोचले आहे. मस्क यांची या कंपनीत ४२% भागीदारी असून, कंपनी शेअर बाजारात सूचीबद्ध झाल्यास ही संपत्ती आणखी वाढण्याची शक्यता आहे.
- १ ट्रिलियन डॉलर्सचा नवा करार : टेस्लाच्या भागधारकांनी नोव्हेंबर २०२५ मध्ये मस्क यांच्यासाठी १ ट्रिलियन डॉलर्सच्या नवीन पे-पॅकेजला मंजुरी दिली आहे. यामुळे मस्क यांच्या भविष्यातील कमाईचे मार्ग अधिक प्रशस्त झाले आहेत.
'ब्लास्टर' गेमपासून सुरू झालेला प्रवास
इलॉन मस्क यांचा प्रवास हा थक्क करणारा आहे. वयाच्या अवघ्या १० व्या वर्षी कोडिंग शिकलेल्या मस्क यांनी १२ व्या वर्षी 'ब्लास्टर' नावाचा व्हिडिओ गेम तयार करून ५०० डॉलर्सना विकला होता. हीच त्यांच्या व्यावसायिक जीवनाची पहिली पायरी ठरली.
मस्क यांचे 'साम्राज्य'
- टेस्ला : इलेक्ट्रिक वाहनांच्या क्रांतीचे जनक.
- स्पेसएक्स : मंगळ ग्रहावर मानवी वस्ती वसवण्याचे स्वप्न पाहणारी कंपनी.
- न्यूरालिंक : मानवी मेंदू आणि संगणक जोडण्याचे तंत्रज्ञान विकसित करणारी कंपनी.
- एक्स एआय : आर्टिफिशिअल इंटेलिजन्स क्षेत्रातील त्यांची नवीन स्टार्टअप कंपनी आता २३० अब्ज डॉलर्सच्या व्हॅल्युएशनवर पोहोचली आहे.
मस्क विरुद्ध जग
| नाव | संपत्ती (अब्ज डॉलर्समध्ये) |
| इलॉन मस्क | ७५० |
| लॅरी पेज (गुगल) | २५२.६ |
| जेफ बेजोस (ॲमेझॉन) | २३९.४ |
| लॅरी एलिसन | २४२.७ |
वाचा - वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
"मस्क यांची ही संपत्ती इतकी अफाट आहे की ती भारताच्या पहिल्या ४० श्रीमंत व्यक्तींच्या एकत्रित संपत्तीच्या बरोबरीची आहे."
