इंडियन प्रीमियर लीगच्या १८ व्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या (RCB) विजयानं उत्साहित झालेल्या विजय मल्ल्यानंसोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट शेअर केली होती. देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआयनंही यावरून त्याची खिल्ली उडवली आहे. विजय मल्ल्यानं आरसीबीच्या विजयाच्या आनंदात सोशल मीडिया साइट एक्सवर एक पोस्ट केली होती, ज्याला उत्तर देताना एसबीआयसह सर्व युजर्सनं त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली. हजारो कोटींच्या बँक घोटाळ्यानंतर विजय मल्ल्या सध्या फरार आहे.
विजय मल्ल्या आरसीबीचा माजी मालक आहे आणि त्याने ही फ्रँचायझी तयार केली होती. एसबीआय आणि अन्य बँक घोटाळ्याप्रकरणी तो सध्या फरार असून लंडनमध्ये राहतो. आरसीबीचं जेतेपद जिंकल्यानंतर विजय मल्ल्यानं एक्सवर एक पोस्ट टाकून संघाचे अभिनंदन केलं. त्यानं पोस्ट करताच सर्व युजर्स ट्रोल करण्यासाठी तुटून पडले.
भारतानं चुपचाप टाकले आपले पत्ते, चीनचं वाढणार टेन्शन; टॅरिफवरील ही भविष्यवाणी समजून घ्या
"१८ वर्षांनंतर आरसीबी आयपीएलचा चॅम्पियन बनलाय. २०२५ च्या स्पर्धेत संघाची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. पूर्णपणे समतोल असलेल्या संघानं मजबूत कोचिंग आणि सपोर्ट स्टाफसह चांगली कामगिरी केली आहे. खूप खूप अभिनंदन," अशी पोस्ट विजय माल्ल्यानं शेअर केली होती.
विजय मल्ल्याची ही पोस्ट लाखो नेटकऱ्यांनी पाहिली आणि त्यावर प्रतिक्रियाही दिल्या. पण, सर्वात खास प्रतिक्रिया स्टेट बँक ऑफ इंडियाची होती. मल्ल्याच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना एसबीआयनं लिहिलं की, 'सर, भारतात या. आपण एकत्र सेलिब्रेट करू'. एसबीआयन दिलेल्या रिप्लायचा स्क्रिनशॉट व्यवसायिक हर्ष गोएंका यांनीही आपल्या अकाऊंटवरून शेअर केला आणि "म्हणूनच मला एक्स खूप आवडतं, असंही म्हटलं.
That’s why I like X pic.twitter.com/hR3QIEwJWV
— Harsh Goenka (@hvgoenka) June 4, 2025
आणखी काय म्हटलं माल्ल्यानं?
विजय मल्ल्यानं आणखी एक पोस्ट शेअर करत विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स आणि ख्रिस गेलचं कौतुक केलं. "जेव्हा मी आरसीबीची निर्मिती केली तेव्हा माझं स्वप्न होतं की आयपीएल ट्रॉफी बंगळुरूला मिळावी. संघाची बांधणी करताना आम्ही युवा विराट कोहलीला प्राधान्य दिलं आणि तो गेल्या १८ वर्षांपासून आरसीबीशी जोडला गेला आहे ही चांगली गोष्ट आहे. ज्यांनी हे स्वप्न साकार केलं त्या सर्वांचे अभिनंदन आणि आभार. आरसीबीचे चाहते सर्वोत्तम आहेत आणि ते आयपीएल ट्रॉफीसाठी पात्र आहेत," असं तो म्हणाला.