RBI Cuts Repo Rate: मोदी सरकारने १२ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करुन मध्यमवर्गीयांना गुड न्यूज दिली होती. याच आनंदात 'दह्यात साखर टाकावी' तसा निर्णय भारतीय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे. रिझर्व्ह बँकेने कर्जदारांना मोठी भेट दिली आहे. आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांची घोषणा नवीन गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी केली. या समितीने रेपो दर एक चतुर्थांश टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. आरबीआयचा रेपो दर ६.५० टक्क्यांवरून ६.२५ टक्क्यांवर येईल. सेंट्रल बँकेच्या या निर्णयानंतर बँकांना गृहकर्ज, कार कर्ज, शैक्षणिक कर्ज, कॉर्पोरेट कर्ज आणि वैयक्तिक कर्जावरील व्याजदर कमी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याआधी मे २०२० मध्ये कोरोना महामारीमुळे देशात लॉकडाऊन होता जेव्हा RBI ने व्याजदर कमी करण्याचा निर्णय घेतला होता. आरबीआयच्या निर्णयानंतर २०, ३० आणि ५० लाखांच्या गृहकर्जावर EMI किती कमी होईल?
२५ बेसिस पॉइंट्स कपातीवर EMI किती होईल?
जर एखाद्याने २० लाख रुपयांचे गृहकर्ज घेतले असेल आणि कर्जावरील व्याज ८.५ टक्के असेल. या कर्जाचा कार्यकाळ २० वर्षांसाठी असेल, तर ईएमआय १७,३५६ रुपये असेल. आता आरबीआयने 25 बेस पॉइंट्स किंवा ०.२५ टक्के व्याज कपात केली आहे. अशा परिस्थितीत कर्जाचा व्याजदर ८.२५ टक्के होईल. या आधारावर, तुमच्या २० लाख रुपयांच्या कर्जावर केवळ १७,०४१ रुपये मासिक ईएमआय भरावा लागेल. म्हणजेच दरमहा ३१५ रुपयांची बचत होईल. आता ही बचत कमी वाटत असली तर २० वर्ष हा कालावधी मोठा आहे.
दुसऱ्या उदाहरणात एखात्याने ८.५० टक्के व्याजदराने ३० लाख रुपयांचे गृहकर्ज २० वर्षांसाठी घेतले असेल. तर त्याला दरमहा २६,०३५ रुपये EMI भरावे लागत होता. आता आरबीआयच्या निर्णयानंतर कर्जाचा मासिक हप्ता २५,५६२रुपये होईल. यानुसार तुमची दरमहा ४७३ रुपयांची बचत होणार आहे.
जर एखाद्याने ५० लाख रुपयांचे गृहकर्ज ८.५० टक्के व्याजाने २० वर्षांसाठी घेतले असेल, तर त्याला दरमहा ४३,३९१ रुपयांचा EMI भरावा लागेल. परंतु, आरबीआयने व्याजदर २५ बेस पॉइंटने कमी केला आहे. अशा वेळी हा मासिक EMI ४२,६०३ रुपये होईल. म्हणजेच दरमहा ७८८ रुपये वाचणार आहेत.
५ वर्षात पहिल्यांदा व्याजदर स्वस्त
आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली ५ ते ७ फेब्रुवारी दरम्यान चलनविषयक धोरण समितीची बैठक पार पडली. एमपीसीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांची घोषणा करताना संजय मल्होत्रा यांनी रेपो दरात ०.२५ टक्के कपात करण्याची घोषणा केली. आरबीआयच्या या निर्णयामुळे बँकांसाठी कर्ज घेणे स्वस्त झाले आहे. बँका लवकरच नवीन कर्ज घेणारे आणि जुने ग्राहक या दोघांनाही त्याचा लाभ देतील अशी अपेक्षा आहे. याआधी २०२० मध्ये आरबीआयने रेपो दरात कपात केली होती.